पनवेल दि.७: पनवेलचे चित्रकार केविन डायस याच्या दोन जलरंग निसर्ग चित्रांची ६४व्या महाराष्ट्र राज्य कला शासकीय प्रदर्शनासाठी (कलाकार विभाग) निवड झाली आहे. जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे बुधवार, ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, या प्रदर्शनात पनवेलच्या केविन डायसची दोन चित्रे झळकणार आहेत.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचालनालय आयोजित ६४वे महाराष्ट्र राज्य कलाकार विभागाच्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन, ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव’ पुरस्कारार्थी लक्ष्मण श्रेष्ठ यांचा सन्मान, प्रदर्शनाचे सत्कारमूर्ती शकुंतला कुलकर्णी यांचा सन्मान व कलाकार विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने आयोजित केलेल्या ६४व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. उच्च व तंत्र शिक्षण माजी राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्यासह राज्यभरातील प्रख्यात कलाकारदेखील उपस्थित होते.
या प्रदर्शनात केविन डायस याने रेखाटलेल्या काश्मीर येथील निसर्गचित्राची निवड झाली आहे. यामध्ये केविनने कश्मिरा आणि बेताब व्हॅली येथील चित्र त्याठिकाणी बसून रेखाटले आहेत. ‘या चित्रांची दखल राज्याच्या कला विभागाने घेतली असून, दिग्गज मान्यवरांच्या व्यासपीठावर माझी चित्रे प्रदर्शित करणे हा माझ्या कलेचा सन्मान आहे. तसेच कलाकार विभागामध्ये माझी पहिल्यांदाच निवड होत आहे. ही बाब अत्यंत आनंदाची आहे’, असे केविनने सांगतो.