आज रविवार दि. २५ ॲाक्टोबर रोजी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी रात्री आपणास कोजागरीचा चंद्र दिसणार आहे. आश्विन पौर्णिमा मध्यरात्री असेल तो दिवस कोजागरी पौर्णिमेचा- शरद पौर्णिमेचा असतो. आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते.वातावरणात धूलिकण नसतात. चंद्राचे टिपूर चांदणे पडते. आक्टोबर हिटमध्ये दिवसभर थकून गेलेला जीव चंद्राच्या चांदण्यात, वा-याच्या मंद लहरीत सुखावतो, आनंदित होतो म्हणूनच हा ‘कोजागरीचा सण’ पूर्वाचार्यांनी ठरविला असावा. शरद ऋतूमधील पित्ताचा त्रास कमी व्हावा यासाठी यारात्री या सुखद टिपूर चांदण्यात आप्तेष्ट मित्रमंडळींबरोबर मौजमज्जा करतांना केशरी मसाला दूध, नारळपाणी आणि पोहे खावे असं सांगण्यात आले आहे.आपल्याकडे तसे प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व सांगितलेले आहे. परंतू पावसाळ्यानंतर येणा-या या कोजागरी पौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. उत्तर अमेरिकन आणि युरोपियन लोक ॲाक्टोबर महिन्यातील चंद्राला ‘ हंटर्स मून ‘ म्हणून ओळखतात. कारण नंतर येणा-या विंटर सिझनमध्ये शिकार मिळत नाही, म्हणून ॲाक्टोबर महिन्यातील ‘ हंटर्स मूनच्या ‘ प्रकाशात शिकार करून ते अन्न साठवून ठेवतात.भारतात कोजागरी पौर्णिमेचे व्रत सांगितलेले आहे.या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांच्या प्रतिमांची पूजा करतात. काही उपासक दिवसभर उपोषण,रात्री पूजन आणि जागरण करतात. यारात्री मंदिरात, उद्यानात, रस्त्यात तसेच घरासभोवतालच्या अंगणात दिवे लावतात. देवांना पोहे , नारळपाणी यांचा नैवेद्य अर्पण करतात. पौर्णिमेच्या चंद्राला केशरी दूध- खीर यांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि “ को जागर्ति ?” म्हणजे “ कोण जागा आहे ?”असे विचारते. जो जागृत असेल त्याच्यावर ती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे.“ को जागर्ति ? “ याचा अर्थ केवळ शारीरिकदृष्ट्या कोण जागा आहे असा नाही. तर शरीराची , घराची आणि परिसराची स्वच्छता ठेवण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात , योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात , ठरविलेली वेळ पाळण्यात, शिस्तीचे व नीती-कर्तव्याचे, प्रामाणिकपणाचे पालन करण्यात, अज्ञानाच्या निद्रेतून कोण जागा आहे ? असा त्याचा अर्थ आहे. त्यालाच सुखसमाधानाची- ऐश्वर्याची ही लक्ष्मी प्राप्त होत असते. जिथे स्वच्छता आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे नीतिमान लोक राहतात, जिथे योग्य दिशेने परिश्रम करणारी माणसे राहतात तेथे लक्ष्मीला रहायला आवडत असते. लक्ष्मी ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिची आठ रूपे असल्याचे म्हटले आहे. (१) धनलक्ष्मी (२) धान्यलक्ष्मी (३) धैर्यलक्ष्मी (४) शौर्यलक्ष्मी (५) विद्यालक्ष्मी (६) कीर्तीलक्ष्मी (७) विजयलक्ष्मी (८) राज्यलक्ष्मी ही आठ रूपे पूजनीय ठरली आहेत. बल आणि उन्माद हे लक्ष्मीचे दोन पुत्र आहेत. परंतु हे पुत्र भावात्मिक असावेत. कारण ज्याच्या घरी लक्ष्मी येते तो बलवान होतो. आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे लक्ष्मीचे चार पुत्र असल्याचे श्रीसूक्तात म्हटले आहे.आपला चंद्रआपल्या सूर्यमालेत बुध, शुक्र ग्रहांना चंद्र नाहीत. पृथ्वीला एक चंद्र आहे. मंगळ ग्रहाला २ ,गुरू ग्रहाला ११५, शनी ग्रहाला २९३, युरेनस ग्रहाला २९ आणि नेपच्यून ग्रहाला १६ चंद्र आहेत.आपल्या चंद्राचा जन्म ४.५१ अब्ज वर्षांपूर्वी झाला. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर दूर आहे.चंद्र स्वत:भोवती २७.३ दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. याच कालावधीत तो पृथ्वीभोवतीही एक भ्रमण पूर्ण करतो म्हणून पृथ्वीवरून चंद्र पहात असतांना त्याची एकच बाजू आपणास दिसत असते. आश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला अश्विनी नक्षत्रात उगवतो आणि रात्र संपतांना पश्चिमेस मावळतो.चंद्र जेव्हा पृथ्वीच्या छायेत येतो त्यावेळी चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण पौर्णिमेच्याच दिवशी होत असते.. त्यावेळी पौर्णिमा असूनही चंद्र लालसर -काळसर दिसतो. चंद्रग्रहणाच्यावेळी जेथून आकाशात चंद्र दिसतो तेथे चंद्रग्रहण दिसत असते. चंद्रग्रहण दिसण्याची वेळ सर्वत्र एकच असते. चंद्रग्रहणाचे तीन प्रकार आहेत. (१) खग्रास चंद्रग्रहण -ज्यावेळी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येते त्यावेळी ‘ खग्रास चंद्रग्रहण ‘ दिसते. (२) खंडग्रास चंद्रग्रहण -ज्यावेळी चंद्रबिंबाचा काही भाग पृथ्वीच्या छायेत येतो त्यावेळी ‘ खंडग्रास चंद्रग्रहण ‘ दिसते. (३) छायाकल्प ( मांद्य ) चंद्रग्रहण – ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणार्या विरळ छायेमध्ये येते त्यावेळी ‘ छायाकल्प चंद्रग्रहण ‘ दिसते. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्रबिंब पौर्णिमा असूनही कमी तेजस्वी दिसते. चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येते.चला जाऊ चंद्रावर !चला आज कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण चंद्रावर जावूया. चंद्रावर वातावरण नाही. आपल्याला पृथ्वीवरूनच प्राणवायू न्यावा लागेल. चंद्रावर आपले वजन कमी होईल. पृथ्वीवर ६० किलो वजन असेल तर चंद्रावर फक्त १० किलो होईल. चंद्रावर आणखी काय दिसेल ? चंद्रावरून आकाश काळे दिसते. सूर्य व तारका एकदम दिसतात. चंद्रावरून पृथ्वी जास्त चौपट मोठी व जास्त तेजस्वी दिसते. पृथ्वी ३१ टक्के प्रकाश परावर्तित करते.त्यामुळे चंद्रावरून पाहतांना ती जास्त तेजस्वी दिसते. चंद्रावर वातावरण नसल्याने तारका जास्त तेजस्वी दिसतात. आपल्या पृथ्वीवर जी पौर्णिमा ती चंद्रावर अमावास्या असते. आणि आपल्या पृथ्वीवर अमावास्या ती चंद्रावर पौर्णिमा असते. आपल्या पृथ्वीवरून चंद्रग्रहण दिसते ते चंद्रावरून सूर्यग्रहण दिसते. आपल्या पृथ्वीवरून जेव्हा सूर्यग्रहण दिसते ते चंद्रावरून पृथ्वीग्रहण दिसते.चंद्रावर वातावरण नसल्यामुळे पृथ्वीवर पडतो तसा संधीप्रकाश पडत नाही.पृथ्वीचा अक्ष २३.५ ने कललेला आहे तर चंद्राचा १.५ ने कललेला आहे. चंद्रावर अनेक ज्वालामुखी विवरे व अशनी विवरे आहेत त्यांनाकोपर्निकस,होमी भाभा, मेघनाथ साहा, सत्येंद्र बोस, विक्रम साराभाई इत्यादी शास्त्रज्ञांची नांवे दिलेली आहेत.प्रत्येक भाषेत चंद्रावर कवी आणि गीतकारांनी असंख्य कविता- गीते लिहिलेली आहेत. प्रभू रामचंद्रांनी चंद्रासाठी हट्ट केला तेव्हा कौसल्यामातेनी चंद्रबिंब आरशात पकडून दाखविले अशी कथा आहे. अनेक माता चांदोबाला आपला भाऊ मानून भाऊबीजेला त्याला ओवाळीत असतात. तसेच आपल्या मुलांना तो चंदामामा अशी ओळख करून देत असतात. अनेक उपासक संकष्ट चतुर्थीला दिवसभर उपवास करून रात्री चंद्राचे दर्शन घेऊनच उपवास सोडतात. दीपावलीमध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंतच्या मुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात.जगभरात चंद्राविषयी काही अंधश्रद्धाही आहेत. चंद्राविषयी गमतीशीर गैरसमज आहेत. पौर्णिमेला जन्मलेली मुले भाग्यवान व अमावास्येला जन्मलेली मुले कमनशिबी असतात असे समजतात. सर्व मृत व्यक्तींचे आत्मे चंद्रावर जातात असेही काही देशात समजले जाते. चंद्रप्रकाशात झोपू नये असेही मानले जाते. कृष्ण अष्टमीला कोंबड्या जास्त अंडी देतात असेही काही देशात मानले जाते. पौर्णिमेला शेताची कापणी केली तर धान्य जास्त मिळते असा समज आहे.चंद्राकडे बोट दाखवले तर संकटे येतात असेही काही देशात मानतात.गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला तर चोरीचा आळ येतो असे आपल्याकडील पुराणातील एका कथेत सांगितले आहे. पौर्णिमेच्या दिवशी खिळा ठोकला तर वाईट असते असाही काही देशात समज आहे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चामखिळीवर नऊ वेळा फुंकर घातली तर ती निघून जाते असाही पूर्वी समज होता. पौर्णिमेच्या दिवशी तरुणीने केक बनवला तर तर पहिला खाणारा तिचा पती होतो असाही काही देशात पूर्वी समज होता.रविवारी २५ ॲाक्टोबर रोजी रात्री आपण जागृत राहून शरद ऋतूत येणा-या कोजागरी पौर्णिमेच्या चंद्राच्या टिपूर चांदण्यात आनंद घेऊया. नारळपाणी, केशर घातलेले मसाला दूधाचा चंद्राला नैवेद्य दाखवून शरद ऋतूमध्ये पित्त वाढू नये म्हणून ते प्रसाद म्हणून प्राशन करूया आणि जीवनात सदैव जागृत राहून लक्ष्मी आणि ऐरावतावरील इंद्राची प्रार्थना करूया—-नमस्ते सर्वदेवतानां वरदाऽसि हरिप्रिये ।या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे स्यात् तवदर्शनात् ॥विचित्रैरावतस्थाय भास्वत्कुलिशपाणये ।पौलोम्यालिड्.गताड्.गाय सहस्त्राक्षाय ते नम: ॥—- हे हरिप्रिये लक्ष्मी, तू सर्व देवांना वर देणारी आहेस.तुला नमस्कार असो. तुला शरण येणा-यांना जी गती लाभते, ती तुझ्या दर्शनाने मला प्राप्त होवो. चित्रविचित्र ऐरावतावर बसलेल्या , तेजस्वी वज्र हाती धारणकरणा-या व पौलोमीने आलिंगन दिलेल्या अशा सहस्राक्ष इंद्राला नमस्कार असो.
