पनवेल दि.२४: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (अधिकारप्रदत्त स्वायत्त) द्वितीय वर्षे जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी JUO अथर्व देसाई याने अखिल भारतीय थलसेना कॅम्प (AITSC) २०२६ मध्ये महाराष्ट्र संचालनालयाच्या संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली.
राष्ट्रीय छात्रसेना (NCC) मधील कॅडेट म्हणून AITSC २०२६ साठी निवड होण्यापूर्वी अथर्वला एकूण सात प्रशिक्षण व निवड शिबिरांमधून जावे लागले. या प्रवासात २ CATC, १ Pre-IGC, १ IGC आणि ३ CAT/Pre-TSC शिबिरांचा समावेश होता. सातत्यपूर्ण अभ्यास, शारीरिक व बौद्धिक तयारी, विविध स्पर्धात्मक चाचण्या आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांतून त्याने राष्ट्रीय स्तरावरील या कॅम्पपर्यंत मजल मारली.
सुरुवातीच्या बटालियन व ग्रुप स्तरावरील निवड प्रक्रियेत विषयाधारित लेखी व तोंडी परीक्षा, तसेच ‘Red Book’च्या धर्तीवर बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर IGC (Inter Group Competition) हा महत्त्वाचा टप्पा पार पडला. IGC मधील निवड चाचण्या तीन टप्प्यांत झाल्या. पहिल्या दोन टप्प्यांत वैयक्तिक कामगिरी व स्थान निश्चित करण्यावर, तर तिसऱ्या टप्प्यात गटाच्या एकत्रित कामगिरीवर भर देण्यात आला.
IGC मध्ये अथर्वने महाराष्ट्रातील अव्वल १० कॅडेट्समध्ये स्थान मिळवले. त्यानंतर सलग तीन CAT/Pre-TSC प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्याने चांगली कामगिरी कायम ठेवली. CAT १ मध्ये महाराष्ट्रात ८वा, CAT २ मध्ये ६वा आणि CAT ३/Pre-TSC मध्ये ५वा क्रमांक मिळवत त्याने आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा केली.दिल्ली येथे झालेल्या AITSC मध्ये MH DTE च्या Senior Division (SD) संघाने Health & Hygiene (HH) विषयात अखिल भारतीय स्तरावर ५ वे स्थान, तर Service Subject मध्ये ४थे स्थान मिळवले. या राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा अथर्व हा महाविद्यालयासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य, नियमित सराव आणि अभ्यासातील सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर JUO अथर्व देसाई याने आपल्या जिद्दीचे आणि समर्पणाचे दर्शन घडवत अखिल भारतीय थलसेना कॅम्प (AITSC) २०२६ साठी महाराष्ट्र संचालनालयाच्या संघात मानाचे स्थान मिळवले.
अथर्वच्या या उल्लेखनीय कामगिरी साठी चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य मा. प्रो. डॉ.एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव, एएनओ लेफ्टनंट डॉ. एन. पी. तिदार, सब लेफ्टनंट डॉ. जे. एम. पावरा (नेवल युनिट), सीटीओ प्रा.एस. एस. व्यवहारे, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. एस. एस. कोकितकर तसेच सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
