उलवे ता. ७: आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या कणखर नेतृत्वामुळे अटल सेतूच्या कामगारांना पहिल्यांदाच दिवाळी बोनस मिळाला आहे. वास्तविक अटल सेतू उभारणीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याशी थेट संवाद साधून अटल सेतू प्रकल्पबाधित गव्हाण, जासई, चिर्ले, न्हावा शेतकऱ्यांना २२.५ टक्के भूखंड आणि येथील स्थानिकांना रोजगार, ग्रामपंचायतींना पाच कोटी रुपये विकास निधी मिळवून देण्यासाठी धडपडणारे नेते आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत आहेत. त्यांच्यासोबत त्यावेळी सुरेश पाटील, नरेश घरत, बाळा पाटील हेही होते. गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रांची नवीन इमारत एमएम आरडीएच्या पाच कोटी विकास निधीतून होणार आहे. यापूर्वी महेंद्र घरत जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्लॅब टाकला होता.
साडेबावीस टक्केचे पॅकेज फक्त नवी मुंबई विमानतळबाधित शेतकऱ्यांना मिळत होते, मात्र अटल सेतू बाधित आणि उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पग्रस्तांना ते पॅकेज मिळवून देण्यासाठी महेंद्र घरत यांचाच पुढाकार होता. त्यामुळे पुष्पक नगर येथील सेक्टर २६ ची लॉटरी सिडकोला पुन्हा काढावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा मिळाला. तसेच अटल सेतूवर २४० स्थानिक युवकांना रोजगार मिळाला, परंतु गेली तीन वर्षे त्यांना बोनस मिळत नव्हता. ठेकेदार कामगारांना त्रास देत होता. जुमानत नव्हता. काही कामगारांना घरी बसवले होते. त्यामुळे कामगारांनी महेंद्र घरत यांची भेट घेतली. त्यांच्याकडे व्यथा मांडली. तेव्हा महेंद्र घरत यांनी तातडीने एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची मुंबईत भेट घेतली, संवाद साधला. ठेकेदाराला तंबी दिली, घरी बसवलेल्या कामगारांना कामावर घ्यायला भाग पाडले. बोनस द्यावाच लागेल, असे ठणकावून सांगितले. अखेर आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या दणक्याने ठेकेदारही नरमला आणि त्यामुळेच अटल सेतू टोल नाक्यावरील कामगारांना पहिल्यांदाच दिवाळी बोनस मिळाला आहे. त्याचे वाटप ६ नोव्हेंबरला करण्यात आले, त्यामुळे कामगारांच्या मागणीप्रमाणे ५००० रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पहिल्यांदाच बोनस मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अटल सेतू टोल कामगारांनी महेंद्र घरत यांची ‘सुखकर्ता’वर भेट घेऊन आभार मानले.


