पनवेल दि.४: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (अधिकारप्रदत्त स्वायत्त) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी हवामान बदलाबाबतची चिंता प्रत्यक्ष पर्यावरणीय कृतीत रूपांतरित करण्याचा विधायक संदेश देणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बहुविद्याशाखीय आंतरमहाविद्यालयीन युवा संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुंबईतील श्रीमती पी.एन. दोशी महिला महाविद्यालयात १ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव संशोधन प्रकल्पाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आणि चार हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.
‘चिंतेपासून कृतीकडे : हवामान बदल आणि युवकांची सक्रिय भूमिका’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत महाविद्यालयाचे आलोक सिंग, कस्तुरी मनेवे आणि आकांक्षा ताम्हणकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी ‘चिंताग्रस्त; पण सक्रिय – हवामान बदलाबाबतची चिंता आणि कृतीशीलता समजून घेताना : परिवर्तनासाठी युवकांची भूमिका’ या विषयावर संशोधन प्रकल्प सादर केला.
मुंबई महानगर प्रदेश आणि परिसरातील पर्यावरणीय बदलांचे निरीक्षण करून हवामान बदलाची स्थिती समजून घेणे, तसेच हवामान बदलाबाबत युवकांच्या मनात निर्माण होणारी चिंता आणि त्या चिंतेचे सकारात्मक पर्यावरणीय कृतीत रूपांतर करण्यासाठी युवकांची भूमिका काय असू शकते, याचा अभ्यास या संशोधनातून करण्यात आला.
संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे प्राथमिक माहिती संकलित केली. त्याचबरोबर विविध संस्थांकडून उपलब्ध झालेली दुय्यम माहिती, संबंधित साहित्य आणि पूर्वीच्या संशोधनाचा अभ्यास केला. युवकांमध्ये हवामान बदलाबाबतची चिंता किती प्रमाणात आहे, तिची कारणे कोणती आहेत आणि युवकांना पर्यावरण संवर्धनासाठी सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा शोध घेण्यात आला.
या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे हवामान बदलाच्या समस्येकडे केवळ भीती किंवा चिंतेच्या दृष्टीने न पाहता, त्यावर कृती करण्याची क्षमता युवकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यावरणीय प्रश्नांच्या अभ्यासासाठी संशोधन, माहितीचे विश्लेषण, आधुनिक तंत्रज्ञान आणि युवकांचा सक्रिय सहभाग यांचा प्रभावी मेळ या प्रकल्पात साधण्यात आला. या अभिनव आणि कृतीशील दृष्टिकोनाची दखल घेत परीक्षकांनी प्रकल्पाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दिले.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. पर्यावरणतज्ञ स्टॅलिन डी. आणि ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित असणाऱ्या सुभजीत मुखर्जी यांनी जलपुनर्भरण, पावसाच्या पाण्याचे संधारण आणि जलव्यवस्थापनातील आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रियदर्शनी इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार विजेते अफजल खत्री यांनी पर्यावरण संवर्धन, वननिर्मिती आणि खारफुटी संवर्धनाच्या क्षेत्रातील कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विशेषतः कचराभूमीचे उत्पादक वनक्षेत्रात रूपांतर करण्याच्या त्यांच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणीय समस्यांवरील प्रत्यक्ष उपाययोजनांची प्रेरणा मिळाली.
या स्पर्धेतील सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या पर्यावरणीय जाणिवा अधिक व्यापक झाल्या, संशोधन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपणही अर्थपूर्ण योगदान देऊ शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला. विविध पर्यावरण तज्ज्ञ आणि संशोधकांशी झालेल्या संवादामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाच्या नव्या संधींचीही ओळख झाली.
सी.के.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश केवळ एका स्पर्धेतील पारितोषिक नसून पर्यावरणीय प्रश्नांकडे वैज्ञानिक आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोनातून पाहणाऱ्या नव्या पिढीच्या संशोधनवृत्तीला मिळालेली राष्ट्रीय स्तरावरील पावती आहे. युवकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना प्रत्यक्ष कृतीसाठी प्रेरित करण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांना या यशामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. प्राध्यापक जी.एस.साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश विद्यार्थ्यांनी संपादित केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख व विज्ञान विभाग प्रमुख डॉ. बी. डी. आघाव, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एन. सी. वडनेरे व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!