पनवेल दि.०२: पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या मुंबई झोन क्र. १च्या क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ही स्पर्धा कळंबोली येथील के.एल.ई महाविद्यालय येथे शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबर २०२६ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुलींच्या सुवर्णपदक विजेत्या संघाने महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसी कामगिरी करीत या स्पर्धेची सुवर्ण चॅम्पियनशिप मिळविली. या संघामध्ये शिवकन्या मोहनराव ताटे, करीना अनिकेत पवार,आचल शेळके, दिया समाधान कोळी या विद्यार्थिनींचा समावेश होता.
तसेच महाविद्यालयाचा मुलांच्या संघाने रौप्य पदक चॅम्पियनशिप मिळवीत महाविद्यालयाचा दबदबा कायम राखला.या संघामध्ये राज कमल्या भगत, साहिल श्रीकांत साळुंखे, विभव घरत,सत्यम ठाकूर आणि तन्मय सावंत या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
साहिल श्रीकांत साळुंखे याने मुलांच्या गटात रौप्य पदक प्राप्त करून महाविद्यालयाचा अभिमान जपला आहे.महाविद्यालयाच्या या पदक विजेत्या खेळाडूंपैकी शिवकन्या मोहनराव ताटे, साहिल श्रीकांत साळुंखे आणि राज कमल्या भगत या तीन विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या विभागीयसंघात निवड झाली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी महाविद्यालयाचा जिमखाना विभाग दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चमकदार कामगिरी केली आहे असे प्रतिपादन केले.
आज क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदक व रौप्यपदकाची कमाई करून चॅम्पियनशिपचे मानकरी ठरत विद्यार्थ्यांनी जे घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल त्यांनी सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक केले.
या आनंदाच्या प्रसंगी त्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यास्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्याना महाविद्यालयाच्या जिमखाना कमिटीचे चेअरमन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर,उपप्राचार्य डॉ. सोनू लांडे, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण गवळी, उपप्राचार्य व आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. सोपान गोवे, ग्रंथपाल सुनील अवचिते, प्रा. प्रवीण गायकर, एन.सी.सी. प्रमुख प्रा. रामदास जमनुके, डॉ. यशवंत उलवेकर, जिमखाना कमिटीतील डॉ.लीना मेश्राम, डॉ.रूपश्री कडू, प्रा.अतुल पोखरकर, प्रा.मयूर पाटील, प्रा.नयन कोळी या सर्व सदस्यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
