पनवेल दि.२२: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (स्वायत्त) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) विषयावरील प्राध्यापक विकास कार्यक्रम २ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध शाखांतील एकूण ३६ प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रथम वर्ष कला, वाणिज्य, बी.ए.एफ., बी.एम.एस. आणि विज्ञान शाखांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयीअभ्यासक्रमाचे प्रभावी अध्यापन करता यावे, तसेच प्राध्यापकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक साधनांचा शैक्षणिक प्रक्रियेत परिणामकारक वापर करता यावा,हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कृत्रिम बुद्धिमत्ता ही शिक्षण, व्यवसाय, संशोधन आणि दैनंदिन कार्यपद्धतीत वेगाने परिवर्तन घडवून आणत असताना शिक्षकांना या तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती आणि प्रत्यक्ष वापराचे कौशल्य मिळावे, या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.
चार दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना व इतिहास, मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांतील फरक, ऑटोमेशन, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जनरेटीव एआय, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक आणि जबाबदार वापर यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर AI Project Cycle, विविध प्रकारच्या डेटाची माहिती, Training, Validation, Model Evaluation, Performance Metrics, Prediction आणि AI Architecture यांचा परिचय करून देण्यात आला.
याप्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सैद्धांतिक माहितीवर भर न देता प्रात्यक्षिके यांचा समावेश करण्यात आला. सहभागी प्राध्यापकांना विविध AI साधनांचा वापर करून अध्यापनासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य तयार करणे, प्रभावी प्रॉम्प्ट लिहिणे आणि विषयानुरूप AI साधनांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कला व वाणिज्य शाखांसाठी MS Office AI, Copilot, ChatGPT, Conversational AI आणि Study Tools यांचा वापर, तर विज्ञान शाखेसाठी Python व AI यांची प्राथमिक ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात Machine Learning च्या प्रत्यक्ष उपयोगावर भर देण्यात आला. Classification, Regression, Clustering,Machine Learning Algorithms, Overfitting, Underfittingयांसारख्या संकल्पनांचा प्रशिक्षण देण्यातआले. तसेच सहभागी प्राध्यापकांनी स्वतः सादरीकरण करून प्रशिक्षकांकडून अभिप्राय घेतला. त्यामुळे प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनात कसे वापरता येईल, याचा अनुभव सहभागी प्राध्यापकांना मिळाला.
या प्रशिक्षणासाठी ज्ञान व प्रशिक्षण भागीदार असणाऱ्या AITEQ Ethos LLP, Mumbai या संस्थेचे संस्थापक संतोष माने आणि पार्थ माने यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समन्वयक (NEPImplementationCell) प्रा .एन. सी. वडनेरे यांनी निमंत्रक म्हणून, तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. (डॉ.) बी. डी. आघाव यांनी सहनिमंत्रक म्हणून जबाबदारी सांभाळली.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बदलत्या तंत्रज्ञानाशी प्राध्यापकांना अद्ययावत करण्याबरोबरच त्याचा अध्यापनात सर्जनशील, परिणामकारक आणि जबाबदार वापर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्राध्यापक विकास कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
