पनवेल दि.३: समाजसेवेला प्राधान्य देत अविरतपणे कार्यरत असलेले रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्रतर्फे प्रतिष्ठेचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
या सोहळ्यास संस्थेच्या आधारस्तंभ प्रतिभाताई पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मदत व पुनवर्सनमंत्री मकरंद पाटील, रोहयो, फलोत्पादन, खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेता व समाजसेवक नाना पाटेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, सुरेश म्हात्रे, आमदार रोहित पवार, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्यासह यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे, तर अन्य गौरवमूर्तींना वेगवेगळे पुरस्कार देण्यात येतील. दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक भावनेतून कार्य करीत असतात. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांचा सेवाभावी वारसा ते आजतागायत जपत आहेत. रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शाळा-महाविद्यालयांना उभारी देण्याचे काम त्यांनी केले आहे तसेच विधायक उपक्रमांना ते पाठबळ देत असतात. अशा या दानशूर व्यक्तिमत्त्वाला जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजारामबुवा शेलार आणि सहकाऱ्यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!