गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; आशियाई रौप्यपदक विजेता पार्थ मानेचा विशेष सत्कार
पनवेल, दि.२९: पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते व सुप्रसिद्ध लेखक प्रशांत देशमुख उपस्थित होते. तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, वाय. टी. देशमुख व लोकेनेते दि.बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील उपस्थित होते.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांना संबोधित करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेशी असलेले आपले ऋणानुबंध उलगडून दाखवले. “मी रयत शिक्षण संस्थेशी जोडलेलो आहे. मी याच संस्थेत शिकलो. या संस्थेमुळेच माझ्या जीवनाला दिशा मिळाली. या संस्थेने मला खूप काही दिले असून, संस्थेचे ऋण कधीही फेडता येणार नाही. संस्थेप्रती कृतज्ञ राहणे हे माझे कर्तव्य आहे,” असे भावोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.“रयतमाऊली आणि कर्मवीर अण्णांमुळेच माझे जीवन ‘रयतमय’ झाले,” अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवव्याख्याते व सुप्रसिद्ध लेखक प्रशांत देशमुख यांनी ‘समग्र कर्मवीर पर्व’ उलगडताना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजासाठी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा प्रभावी शब्दांत वेध घेतला. कर्मवीर अण्णा, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीने जपण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून सांगितले. “कर्मवीर भाऊराव म्हणजे दुसरे रवींद्रनाथ,” असे गौरवोद्गार काढत त्यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. शतकानुशतके समाजात रुजलेल्या जातिभेदाच्या भिंती दूर करण्यासाठी कर्मवीर अण्णांनी सर्व समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून दिली. शिक्षणापासून वंचित असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
“कर्मवीर अण्णा आजही लाखो जनांच्या श्वासांत आणि उच्छ्वासांत, तसेच समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या आणि दानशूर व्यक्तींच्या कर्तृत्वातून जिवंत आहेत. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आजही पुढे चालत आहे,” असे प्रशांत देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या प्रगतीचे मूळ रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्यात असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना कर्मवीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून त्यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उद्धारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले. संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीचा आढावा घेत त्यांनी सर्वच क्षेत्रांत संस्थेने अनेक गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे घडविल्याचे नमूद केले.“ज्ञानाची गंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य कर्मवीर अण्णांनी केले. जीवनमूल्यांचे विद्यापीठ म्हणजे कर्मवीर,” असे अनमोल विचार व्यक्त करत त्यांनी महाविद्यालयाच्या चढत्या प्रगतीचा आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जपान येथे आयोजित करण्यात आलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफल या क्रीडाप्रकारात सांघिक रौप्यपदक मिळविणाऱ्या पार्थ राकेश माने याचा विशेष सत्कार करण्यात आला. ही कामगिरी महाविद्यालयाच्या इतिहासाच्या क्रीडा क्षेत्रातील आजवरची सर्वांत मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी आहे.
या कार्यक्रमास करंजाडे गावचे सरपंच मंगेश शेलार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण गवळी, डॉ. सोपान गोवे, डॉ. सोनू लांडे, माजी उपप्राचार्य डॉ. आर. ए. पाटील, डॉ. रमेश म्हात्रे तसेच प्रा.सुनीता काटकर, प्रा.ललिता अवचिते आदी मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील ‘स्वरमयी ग्रुप’च्या विद्यार्थ्यांनी रयतगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गायकर, डॉ. प्रफुल्ल वशेणिकर व डॉ. यशवंत उलवेकर यांनी केले. शेवटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोपान गोवे यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले.
Mahatma Phule College Panvel: महात्मा फुले महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी !
