पनवेल दि.२: दिवाळीच्या मंगलमय पर्वातील पहाट सुरेल स्वरांनी आणि भावस्पर्शी काव्यरचनांनी अधिक आनंददायी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘दिवाळी पहाट २०२६’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजता पनवेलम शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. यंदा या दिवाळी पहाटचे नववे वर्ष आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर स्वरांची आणि सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्या बहारदार काव्यरचनांची अनोखी मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. संगीत आणि काव्य यांचा सुरेख संगम असलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यातून दिवाळीच्या उत्सवी वातावरणाला एक वेगळीच रंगत प्राप्त होणार आहे. दिवाळी पहाट हा मराठी संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम असून, पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सुरेल गीतांचा आणि उत्तम काव्याचा आस्वाद घेणे ही रसिकांसाठी पर्वणी असते. हीच परंपरा जपत पनवेलकरांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाची अनुभूती मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात असून सोमवार, २ नोव्हेंबरपासून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत अमोल स्टेशनरी, टिळक रोड, पनवेल, आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल (वॉचमन टेबल), पनवेल महानगरपालिका, प्रभाग समिती ‘ड’ कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, पनवेल, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कार्यालय, मार्केट यार्ड, पनवेल या ठिकाणी प्रवेशिका मिळतील. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रायोजकत्वाखाली होणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्याला नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून दिवाळी पहाटेचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
