प्रा. आकाश पाटील यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी
पनवेल दि.१६ : संसदीय लोकशाहीची कार्यप्रणाली, देशाचा समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी सी. के. ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला मिळाली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील तृतीय वर्ष कला शाखेच्या भूगोल विभागाचा विद्यार्थी दक्ष मनोजकुमार परमार याने नवी दिल्ली येथे आयोजित ‘कॅम्पस से संसद – अटल इरादे, युवा कदम’ या राष्ट्रीय अभ्यास दौऱ्यात यशस्वी सहभाग नोंदवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दौऱ्यात महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आकाश पाटील यांनी प्राध्यापक समन्वयक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थी संघाचे नेतृत्व केले.
राज्यसभेचे खासदार विनोद तावडे यांच्या पुढाकाराने आयोजित हा अभ्यास दौरा २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडला. प्रत्यक्ष दिल्लीतील कार्यक्रम २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता. देशभरातील तरुणांना संसदेचे कामकाज, भारतीय लोकशाहीची वाटचाल आणि देशाचा ऐतिहासिक व राजकीय वारसा जवळून समजून घेता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कठोर निवड प्रक्रियेतून दक्षची निवड
या राष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून १४५ महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची संबंधित महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर निवड झालेल्या १४५ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यातून ३५ गुणवंत विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. या कठोर निवड प्रक्रियेत यश मिळवत दक्ष परमार याने राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याचा मान मिळवला.
प्रा. आकाश पाटील यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व
या दौऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आकाश पाटील यांची ‘प्राध्यापक समन्वयक’ म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संघाचे नेतृत्व करत दौऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन प्रभावीपणे सांभाळले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिस्त, प्रवास व्यवस्था, वेळेचे नियोजन तसेच विविध स्थळांच्या भेटींचे समन्वयन यांची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. विद्यार्थ्यांचे गट तयार करणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे आणि प्रत्येक उपक्रमात शिस्तबद्ध सहभाग सुनिश्चित करणे यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
या दौऱ्यादरम्यान ‘सहयोगी से संवाद’ आणि ‘भारत थ्रू द विंडो’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सहप्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधत विविध विषयांवरील माहिती जाणून घेतली. त्यामुळे या अभ्यास दौऱ्याला केवळ ऐतिहासिक स्थळांच्या भेटींपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचे स्वरूप प्राप्त झाले.
ऐतिहासिक आणि राजकीय स्थळांचा अभ्यासपूर्ण अनुभव
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, २९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, इंडिया गेट आणि कर्तव्य पथाला भेट दिली. तसेच राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित मुक्तसंवाद आणि स्नेहभोजनात सहभाग घेतला. ३० सप्टेंबर रोजी संसद भवनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी संसदीय कामकाजाची माहिती घेतली. यावेळी राज्यसभेचे सहसचिव डॉ. राघवदास आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याशी मुक्तसंवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. त्यानंतर प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी भारतीय पंतप्रधानांच्या कार्याचा आणि देशाच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. संग्रहालयातील प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमाने या भेटीची अनुभूती अधिक समृद्ध केली. १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्यात आली. या भेटीतून विद्यार्थ्यांना देशाच्या सर्वोच्च घटनात्मक संस्थेची तसेच राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या योगदानाची माहिती मिळाली. २ ऑक्टोबर रोजी गांधी स्मृती संग्रहालय आणि खादी भंडाराला भेट देऊन या अभ्यास दौऱ्याचा समारोप करण्यात आला.
संस्थेकडून कौतुक आणि अभिनंदन
दक्ष परमार याने मिळवलेले यश आणि प्रा. आकाश पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावर पार पाडलेली नेतृत्वाची जबाबदारी याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव, कला शाखेचे प्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील आणि भूगोल विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. डी. एस. नारखेडे यांच्यासह प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणाऱ्या अशा राष्ट्रीय उपक्रमांमुळे तरुणांमध्ये संसदीय लोकशाहीविषयी जागरूकता, राष्ट्रीय दृष्टिकोन आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते. दक्ष परमारचा सहभाग आणि प्रा. आकाश पाटील यांचे नेतृत्व हे सी. के. ठाकूर महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची उल्लेखनीय पावती ठरली आहे.
