कळंबोली दि.२८ (दीपक घोसाळकर): जगात अल निनोच्या प्रभावामुळे सर्वत्र पाण्याची पातळी घसरल्याने पाण्याचा ठणठणाट हा नोव्हेंबर पासून सुरू झाला. पनवेल महापालिकेने तर आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याचेच बंद केले आहे. प्रत्येक नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी, पाणीबचत करावे यासाठी महापालिका नागरिकांना आव्हान करीत आहे. परंतु लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण या उक्तीप्रमाणे महापालिका प्रशासन पाण्याची उधळपट्टी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच बस थांबे धुण्यासाठी चक्क महापालिकेच्याच गाडीचा वापर करून बस थांबे चकाचक दिसण्यासाठी धुतले जात आहेत. त्यासाठी हजारो लिटर पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पाण्याची काटकसर काहीतरी तुम्हीच करा आम्हाला मात्र बस स्थानक धुवायचे आहेत असाच काहीतरी संदेश महापालिका प्रशासन देत नाही ना असा संताप जनक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
यावर्षीच्या पावसाच्या हंगामात पाऊसच कमी झाल्याने सर्वांवरच पाण्याचे संकट ओढले गेले आहे. शासन प्रशासन महापालिकेने पाण्याचा वापर जपून करा यासाठी कंबर कसली आहे.असलेला पाण्याचा साठा हा जून 27 पर्यंत पुरवून नागरिकांची तहान कशीबशी भागवली जाणार आहे. असलेल्या पाण्याचा साठा हा पुरेपूर काटकसरीने कसा वापरता येईल यासाठी राज्य शासन, महापालिका प्रशासन यांनी वेगवेगळे नियोजनही केले आहे.पनवेल महानगरपालिकेने ही विविध प्रकारच्या उपाययोजना करून असलेल्या पाणीसाठा काटकसरीने कसा वापरता येईल याचे नियोजन केले आहे. अनेकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. काही राजकीय पक्षांनी नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, पाण्याचे योग्य नियोजन करा, नव्या बांधकामांना परवानगी व ओसी देऊ नका असे सांगितले आहे. पाणी बचतीसाठी नागरिकही पुरेपूर सहकार्य करीत आहेत. काही गृह निर्माण सोसायटीनी येणाऱ्या पाणीसाठ्याची योग्य नियोजन करून सायंकाळचे पाणी देण्याचे बंद करून टाकले आहे. त्यामुळे नागरिकांना आता पाण्याची काटकसर करण्याची सवय जणू लागली आहे. परंतु एकीकडे महापालिका प्रशासन पाणी बचतीचा आणि काटकसरीचा मंत्र जरी देत असले तरी महापालिक प्रशासन मात्र तसे वागताना दिसत नाही. महापालिकेच्याच पाण्याच्या टँकर मधून महानगरपालिका क्षेत्रात असलेले बस थांबे पाण्याने धुऊन चकाचक केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.नागरिकांना मात्र तुम्ही गाड्या धुवू नका पाण्याचा वापर काटकसरीने करा असे आव्हान करीत असताना महापालिका प्रशासन मात्र स्वतःच्याच पाण्याच्या टँकर मधून रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या बस थांब्याची साफसफाई करण्यासाठी पाण्याचा वापर करताना नागरिकांच्या दृष्टीस पडले आहे. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करून महापालिका प्रशासन असे का वागत आहे असा सवाल ही केला आहे. काहींनी याचे फोटो काढले व्हिडिओ बनवले आणि महापालिकेच्या बाबत संताप व्यक्त केला आहे.
