पनवेल दि.१६: सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशनचे ज्येष्ठ नामधारक तसेच नवी मुंबईतील नेरूळ ज्ञानसाधना केंद्राचे माजी अध्यक्ष विजय सावंत यांनी आपल्या मृत्यूनंतर त्वचा दान करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे .
विजय सावंत यांचे शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी अगोदरच त्वचा व अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया देखील पूर्ण करुन ठेवली होती. इतकेच नव्हे तर ऑपरेशनला जाण्यापूर्वी आपल्या मुलांना त्याची पुन्हा आठवण करून दिली होती. त्यांच्या या इच्छेचा आदर राखत कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगीही घेतलेला हा निर्णय समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
समाजात अवयवदान आणि देहदानाबाबत जनजागृती होत असली, तरी त्वचादानाबाबत अजूनही उदासीनता आहे. श्री विजय सावंत यांच्या या दातृत्वामुळे संपूर्ण संगमेश्वर तालुका आणि परिसरातून त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले जात आहे.
सद्गुरू वामनराव पै प्रणीत जीवनविद्या मिशनचे ज्येष्ठ कार्यकर्ते  असलेले विजय सावंत यांनी आपले संगमेश्वर तालुक्यातील देवरुख जवळ मूळ गाव हातीव तसेच मार्लेश्वर, नवी मुंबईतील नेरुळ आणि उलवे परिसरासह यवतमाळ जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत जीवनविद्येच्या ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी निरपेक्षपणे कार्य केलेले आहे.
विजय सावंत यांचे कुटुंबीय, जीवनविद्या मिशन संस्था, महाराष्ट्र राज्य विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समिती (ZTCC) आणि नवी मुंबईतील नॅशनल बर्न सेंटरच्या स्किन बँक यांच्या समन्वयातून त्वचादानाची प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडली.
सावंत कुटुंबीयांच्या त्वचादानाच्या धाडसी निर्णयामुळे, गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होणार आहे .

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133