नवरात्री संबंधित आजच्या सदरात आपण पनवेल कळंबोलीची कुलस्वामिनी जय तुळजाभवानी माता विषयी माहिती जाणून घेऊयात.
कळंबोली दि.१६ (दीपक घोसाळकर):कळंबोली शहरात अनेक प्रसिद्ध असणारी देवी – देवतांची मंदिरे आहेत, असेच एक कळंबोली सेक्टर १ येथील प्रसिद्ध असे जय तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या जय तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम असणाऱ्या या उत्सवाची धामधूम सुरू असून, आदिशक्तीच्या उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सध्याच्या आधुनिकतेच्या युगात व तरूणाईचे आकर्षण असलेल्या डिस्को दांडियाच्या काळातही येथील नवरात्रोत्सव आपले वेगळेपण टिकवून आहे. या उत्सवाला कळंबोली शहरातील अनेक ठिकाणांहून भाविक आवर्जून हजेरी लावतात.
१९९७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या देवीच्या साध्या असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार करून आरसीसी पध्दतीने, सुंदर नक्षीकाम केलेले मंदिर उभारण्यात आले आहे, मंदिराच्या मध्येभागी संगमरवरी प्रभावळरूपी चौथरा तयार करून त्यावर तुळजाभवानी मातेची मुर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. येथील प्रथेनुसार मंदिरातील मूर्तीच्या दैनंदिन पुजा अर्चेचा मान सेक्टर १ मधील भाविकांना प्रत्येक दिवशी देण्यात येतो. देवीची दररोज सांजवेळी आरती होते. विविध सन – उत्सवाच्या निमित्ताने देविची उपासना केली जाते. नवसाला पावणारी देवी असल्याने इथे नेहमीच भक्तांची गर्दी दिसून येते. मांगल्याचे प्रतिक असलेल्या नवरात्र उत्सव येथे दिमाखदारपणे साजरा केला जातो.
नऊ दिवस येथे जय तुळजाभवानी माता सामाजिक संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवसाला पावणाऱ्या देवीच्या लौकिकामुळे भाविकांची खण – नारळ, साडी – चोळीने देवीची ओटी भरण्यासाठी नऊ दिवस गर्दी उसळते, नवरात्रातीत येथे आजूबाजूच्या भजन मंडळांकडून देवीचा जागर केला जातो. मंडळाची धुरा मंडळातील सर्वच सभासद समर्थपणे पेलत आहेत, या उत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, मागील 30 वर्षापासुन अविरत सुरु असलेले रक्तदान शिबीर जय तुलजाभवानी संस्था व एम.जी.एम हॉस्पिटल कामोठे यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात अनेक रक्तदाते रक्तदान करुन आपले कर्तव्य निभावतात आणि संस्थेस मोलाचे सहकार्य करतात. या रक्तदात्यांचे संस्थे कडुन प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मंडळाने एम.जी.एम हॉस्पिटल, सर्वं रक्तदाते आणि डाॅक्टर, नर्स, आदींचे यांचे आभार मानले. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, आदी प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतात, या स्पर्धा आयोजित करण्यामागे लहान मुलांसह तरूणाईच्या कलागुणांना वाव देणे एवढाच उद्देश असतो, दरवर्षी नित्यनियमाने देवीच्या भव्य अश्या महाप्रसादाचे आयोजन दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिराच्या सभामंडपात केले जाते. आजूबाजूच्या परिसरातील अंदाजे दहा हजारांहून अधिक भक्तजण या महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यासाठी जय तुळजाभवानी सामाजिक संस्था मंडळाचे वरिष्ठ सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली सर्व सभासद खुपच मेहनत घेतात अशी माहिती मंडळाच्या सर्व सदस्यांनी दिली. नऊ दिवस विनातक्रार आपापली नोकरी – धंदा सांभाळून ही सर्व मंडळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. सेक्टर १ मधील रहिवाशी महिला मंडळाची ही त्यांना तेवढीच साथ लाभत आहे. नवरात्रात नऊ दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून दर्शन व देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो, देवीला नऊ दिवस सजविण्याचे काम मंदिरातील पंडित उदय शास्त्री जोशी आणि महिला मंडळ हौशीने करीत असतात. विजयादशमीच्या दिवशी सोने लुटणे हा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी रक्तदान अन्नदान तसेच पनवेल मधील मूकबधिर मुलांच्या चित्रकला रांगोळी स्पर्धांचे आयोजन यावर्षी करण्यात आले आहे धार्मिक पूजा विधी आता सांग पार पडल्या जातात त्यामध्ये शतचंडी, रुद्र चंडी, नवचंडी महापूजा व सप्तशती पाठ, महा हवन,महायज्ञाचे आयोजनही मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर रात्री नऊ दिवस आयोजित केलेल्या विविध स्पर्धा मध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना बक्षिस समारंभ पार पाडतो त्यानंतर या उत्सवाची सांगता होते. नवरात्र उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व लहान-मोठे-वरिष्ठ सदस्य, महिला सदस्य आणि भक्तगण असे सर्वच अहोरात्र परिश्रम घेतात.
