राज्यस्तरीय स्पर्धेत ‘दीपावली’ प्रथम क्रमांक
रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘इंद्रधनू’ प्रथम
यंदापासून डिजिटल अंकांलाही बक्षीस

पनवेल दि.४: सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आणि सर्वाधिक रक्कमेचे पारितोषिक असलेल्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२५ च्या अर्थात रौप्य महोत्सवी वर्षाचा निकाल आज (दि. ०४ ऑगस्ट) जाहीर करण्यात आला आहे.
राज्यभरातील दिवाळी अंकांना प्रोत्साहन देणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार करणाऱ्या अंकांचा आणि साहित्यिकांचा गौरव करण्यात आला आहे. या स्पर्धेचा निकाल श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषेदच्या माध्यमातून जाहीर केला. तसेच यंदाच्या वर्षापासून डिजिटल दिवाळी अंकाचा पारितोषिकांमध्ये समावेश करून प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १० तर तृतीय क्रमांकाच्या डिजिटल अंकाला ०५ हजार रुपयांचे बक्षिस देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्पर्धेत ‘दीपावली’ या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांक पटकावत १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळविले आहे. या अंकाचे संपादक अशोक कोठावळे आहेत. ‘मुक्त संवाद’ या अंकाने द्वितीय क्रमांक मिळवित ५० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले असून, या अंकाचे संपादक विवेक कोरडे आहेत. तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून ‘वसा’ या अंकाचे संपादक सई पवार आणि ‘अक्षरलिपी’ या अंकाच्या संपादिका सौ. शर्मिष्ठा भोसले यांना संयुक्तपणे ३० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत विविध साहित्यिक आणि कलात्मक विभागांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंकांचा आणि लेखकांचा गौरव करण्यात आला आहे. ‘बाईमाणूस’ या अंकाला लक्षवेधी उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार मिळाला असून, त्याचे संपादक प्रशांत पवार यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. ‘धनंजय’ अंकातील ‘आवाज’ या कथेसाठी लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांना उत्कृष्ट कथा पुरस्कार ७ हजार रुपये, तर ‘ललित’ अंकातील ‘टॉलस्टॉयची सायकल’ या लेखासाठी लेखक डॉ. नंदू मुलमुळे यांना उत्कृष्ट लेख पुरस्कार ५ हजार रुपये जाहीर करण्यात आला आहे. ‘युगांतर’ अंकातील ‘त्याने तिरंगा पाहिला’ या कवितेसाठी कवी सतीश लोले यांना उत्कृष्ट कविता पुरस्कार ५ हजार रुपये मिळणार आहेत. ‘नवभारत’ या अंकाला उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार मिळाला असून, संपादक निरंजन हातेकर यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे.बालसाहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘मुलांचे मासिक’ या अंकाला उत्कृष्ट बाल दिवाळी अंकाचा पुरस्कार जाहीर झाला असून, संपादक जयंत मोडक यांना ७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय ‘अक्षर’ अंकातील ‘युद्धकांड’ या परिसंवादासाठी मीना कर्णिक आणि हेमंत कर्णिक यांना लक्षवेधी परिसंवाद पुरस्कार ५ हजार रुपये, तर ‘शब्दांगण’ अंकातील आसाराम लोमटे यांच्या मुलाखतीसाठी मुलाखतकार मनिषा उगले यांना लक्षवेधी मुलाखत पुरस्कार ५ हजार रुपये जाहीर करण्यात आला आहे. ‘साप्ताहिक विवेक’ या अंकाच्या मुखपृष्ठासाठी चित्रकार विनायक खरात यांना सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार ५ हजार रुपये, तर सर्वोत्कृष्ट व्यंगचित्र पुरस्कार ज्ञानेश बेलेकर यांना ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘इंद्रधनू’ प्रथमरायगड जिल्ह्यातील दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतही विविध अंकांनी आपला ठसा उमटविला. या स्पर्धेत ‘इंद्रधनू’ या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांक पटकावत ४० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. या अंकाचे संपादक विजय पवार आहेत. ‘आगरी दर्पण’ या अंकाने द्वितीय क्रमांक मिळवित २० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले असून, या अंकाचे संपादक दीपक राजाराम म्हात्रे आहेत. तर ‘शब्दसंवाद’ या अंकाने तृतीय क्रमांक मिळविला असून, या अंकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या अंकाचे संपादक विनोद बाबुराव साळवी आहेत.रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘रसायनी टाइम्स’ या अंकाला उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला असून, संपादक अनिल भोळे यांना ५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. तसेच ‘पनवेल टाइम्स’ या अंकालाही उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला असून, संपादक गणेश कोळी यांना ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध साहित्य प्रकारांमध्ये उत्कृष्ट लेखन करणाऱ्या साहित्यिकांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. ‘आगरी दर्पण’ अंकातील ‘गॉटर’ या कथेसाठी लेखक किरण शेले यांना उत्कृष्ट कथा पुरस्कार ३ हजार रुपये जाहीर करण्यात आला आहे. ‘श्री समर्थ विचार’ अंकातील ‘ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा’ या लेखासाठी लेखक अरविंद पाशिलकर यांना उत्कृष्ट लेख पुरस्कार ३ हजार रुपये, तर ‘म्हसळा टाइम्स’ अंकातील ‘चाळ’ या कवितेसाठी कवी दिलीपराव झुंजारराव यांना उत्कृष्ट कविता पुरस्कार ३ हजार रुपये जाहीर करण्यात आला आहे.
दिवाळी अंकांना व्यासपीठ राज्यभरातून प्राप्त झालेल्या विविध दिवाळी अंकांचे परीक्षण साहित्यिक गुणवत्ता, आशय, विषयाची निवड, मांडणी, पत्रकारितेचा दर्जा, सामाजिक भान, कलात्मकता, सर्जनशीलता आणि वाचनीयता या विविध निकषांच्या आधारे करण्यात आले. त्यातून विविध विभागांतील विजेत्यांची निवड करण्यात आली. राज्य भरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी विणा सानेकर, रेखा देशपांडे आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक तर समन्वयक म्हणून दीपक म्हात्रे व शैलेंद्र शिर्के यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले कि, मराठी संस्कृतीमध्ये दिवाळी अंकांना मोठी आणि समृद्ध परंपरा आहे. साहित्य, पत्रकारिता, कला, सामाजिक प्रश्न, संस्कृती, इतिहास, व्यक्तिचित्रण, कथा, कविता, वैचारिक लेखन आणि विविध विषयांना दिवाळी अंकांच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळते. बदलत्या काळातही ही परंपरा अधिक समृद्ध व्हावी आणि नव्या पिढीतील लेखक, पत्रकार, साहित्यिक व कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या दिवाळी अंकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून मराठी साहित्य आणि पत्रकारितेची समृद्ध परंपरा जपण्याचे काम केले. दिवाळी अंकांच्या माध्यमातून दर्जेदार साहित्याला चालना मिळावी, समाजातील विविध प्रश्नांवर वैचारिक चर्चा व्हावी, नवोदित लेखकांना संधी मिळावी आणि मराठी भाषा-साहित्याची परंपरा अधिक व्यापक व्हावी, यासाठी या स्पर्धेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे असे सांगून राज्यस्तरीय तसेच रायगड जिल्हास्तरीय विजेत्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अधिकाधिक दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित व्हावेत, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच लवकरच पारितोषिक वितरण सोहळा मुंबईत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातत्याने २५ वर्षे दिवाळी अंक स्पर्धेचा उपक्रम राबविला जात आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. या उपक्रमासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. दिवाळी अंकांसाठी एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिके देणारी अशी स्पर्धा देशात अन्यत्र कुठेही होत नाही. – संदीप चव्हाण, अध्यक्ष- मुंबई मराठी पत्रकार संघ

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!