मुंबई दि.२८: श्री गोविंद गुरु विद्यापीठ, गोध्रा (गुजरात) येथे दिनांक २५ ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत पश्चिम विभागातील तब्बल ५४ विद्यापीठांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या संघाने सलग सहा सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या निर्णायक सामन्यांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या संघाने
मारवाडी विद्यापीठ ३ – १, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ३ – १, वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ ३ – १ प्रमाणे विजय मिळवले.
या तिन्ही बलाढ्य संघांचा ३ – १ अशा फरकाने पराभव करत मुंबई विद्यापीठाने स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखले
मुंबई विद्यापीठाच्या विजयी संघात अनिष सोनटक्के (कर्णधार), अर्णव कर्णावर, संतोष कोलपाटे, आर्यन देशपांडे आणि निलेश येडगे यांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. संघाला मंदार हर्डीकर यांनी प्रशिक्षक म्हणून, तर हर्षद पाटील यांनी व्यवस्थापक म्हणून मार्गदर्शन केले.
या दैदीप्यमान विजयामुळे मुंबई विद्यापीठाचा पुरुष टेबल टेनिस संघ आगामी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या यशाबद्दल कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133