पनवेल दि.१२: सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या तळोजा येथील विष्टाफूड कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) नवीन पनवेल येथील जुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल या सेवाभावी संस्थेला आर्थिक मदतीचा हात दिला आहे. रुग्णालयातील व्हिजन केअर सेंटरच्या सुविधांच्या विकासासाठी कंपनीच्या वतीने लाखोंचा धनादेश रुग्णालय व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आला. विशेष म्हणजे, याच वेळी कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांनी वैयक्तिक स्तरावरही २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमाला विष्टाफूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपिंदर सिंग, कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमण, डॉ.गिरीश गुणे, रुपाली पिल्लई, राहा जैन आदी उपस्थित होते. तसेच रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक डॉ. राजेश कापसे, डॉ. बुद्राणी आणि भारत विकास परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
रुग्णालयामार्फत करण्यात येणाऱ्या नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रियांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाते. या सेवाकार्याला अधिक बळ मिळावे आणि व्हिजन केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने विष्टाफूड कंपनीने सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य केले आहे. यावेळी रुग्णालयाच्या वतीने कंपनीच्या प्रतिनिधींचे आभार मानण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांनी यापूर्वीही समाजातील गरजू आणि वंचित घटकांना स्वतःच्या उत्पन्नातून वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे. केवळ संस्थेच्या माध्यमातूनच नव्हे, तर वैयक्तिक स्तरावरही सामाजिक दायित्व जपण्याची त्यांची भूमिका या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली. शंकरा आय हॉस्पिटलच्या सेवाकार्याला हातभार लागावा, या भावनेतून त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून २५ हजार रुपयांचा धनादेश रुग्णालयाला सुपूर्द केला. कंपनीच्या सीएसआर मदतीसोबतच स्वतःचे योगदान देत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
तळोजा येथील विष्टाफूड कंपनीने पनवेल परिसरातील विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य केले आहे. कंपनीच्या या योगदानामुळे गरजू रुग्णांना नेत्रसेवेच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
कंपन्यांनी सीएसआर निधीचा उपयोग केवळ औपचारिकता म्हणून न करता परिसरातील गरजू घटकांच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी करावा. तसेच सक्षम व्यक्तींनीही आपल्या उत्पन्नातील काही वाटा समाजासाठी द्यावा, हा संदेश विष्टाफूड कंपनी आणि चंद्रशेखर सोमण यांच्या या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे.


