पनवेल दि.०३: आतापर्यंत २७५ वेळा प्लेटलेट दान करून एका सामान्य नागरिकाने समाजासमोर दातृत्वाचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. ‘गणपती बाप्पाच्या कृपेमुळे आणि अनेकांच्या आशीर्वादांमुळेच मी या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो,’ अशा भावना प्लेटलेट दाते श्रीराम जोशी यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या विक्रमी आणि प्रेरणादायी प्रवासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. श्रीराम जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आजवरचा प्लेटलेट डोनेशनचा प्रवास अत्यंत समाधानकारक राहिला आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले. विशेषतः कोविड-१९ च्या भीषण महामारीच्या काळात परिस्थिती अत्यंत बिकट आणि डोकं सुन्न करणारी होती. मात्र, लोकांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि बाप्पाच्या अथांग कृपेमुळेच या अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढता आला, असे जोशी आवर्जून सांगतात. आशेचा किरण आणि सामाजिक कर्तव्यसध्याच्या काळात गंभीर आणि दुर्धर आजारांचे वाढते रुग्ण पाहून मन नक्कीच दुःखी होते. परंतु, या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी प्लेटलेट दान हा एक मोठा आशेचा किरण ठरत आहे. ‘आपल्या रक्तातील प्लेटलेट्समुळे कुठेतरी, कोणाचे तरी प्राण वाचले असतील आणि तो माणूस आज आपल्या कुटुंबात आनंदी असेल, हा विचारच मनाला सुखावतो. मी नेहमीच त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या प्रतीक्षेत असतो,’ असे जोशी यांनी म्हटले. नियम आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन२७५ वेळेच्या या विक्रमी प्रवासात श्रीराम जोशी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व आवश्यक नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले आहे. स्वतःच्या प्रकृतीची योग्य काळजी घेत त्यांनी हे सातत्य टिकवून ठेवले. भविष्यात इतरही नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आणि नियमांचे पालन करत या रक्तदान व प्लेटलेट दानाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या या छोट्याशा प्रयत्नामुळे गरजू व्यक्तीला नवीन जीवन जगण्यास मोठी मदत होऊ शकते, असा विश्वास त्यांनी खबरबताशी बोलताना व्यक्त केला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!