कळंबोली दि.२४ : कळंबोलीत सध्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. सेक्टर चार मधील रस्ते तीन दिवसापासून डांबरी करण्याचे काम हाती घेतले आहे. दोन ते तीन वेळा रस्त्यावरील धूळ हाय प्रेशरने उडल्यामुळे उडालेली धूळ दुकानात, घरात, नागरिकांच्या नाका तोंडात गेल्याने धुळीची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील धूळ झाडून उडवण्यासाठी हवेची फवारणी सुरू केली की व्यापारी दुकानच बंद करून ठेवतात. त्याचा परिणाम त्यांच्या व्यापारावरही होत आहे. पण याचे सोयरसुतक ना महापालिकेला ना ठेकेदाराला. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करण्याची मागणी कळंबोलीतील नागरिक करू लागले आहेत.
कळंबोली वसाहतीत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. मात्र डांबरीकरण करताना योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहे. सेक्टर ४ मधील डांबरीकरण हे तीन दिवसापासून सुरू आहे. रस्ता करण्यापूर्वी साफ केला जातो किंवा जेसीबीने खरवडला जातो. मोठ्या हाय प्रेशरने रस्त्यावरील धूळ झटकण्याचे काम करून त्यावर त्वरित डांबरीकरण न केल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन ते तीन वेळा रस्ता हवेच्या प्रचंड दाबाने साफ केल्याने उडालेली धूळ हे आजूबाजूच्या दुकानात घरात नागरिकांच्या नाकात तोंडात जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सेक्टर चार मधील रस्त्यावरील धूळ ही दोन ते तीन वेळा झाडून काढल्याने धुळीच्या दहशतीने व्यापाऱ्यांनी यावेळी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सारखी दुकानात उडालेली धूळ साफ करण्यात त्यांचा जास्त वेळ खर्च होतो. याची काहीही खंत ना महापालिका प्रशासन व ठेकेदाराला नसल्याची नाराजी नागरिक व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर कळंबोलीतील रस्ते चे डांबरीकरण हे रात्रीच्या वेळेस करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.