पनवेल दि.२४: पनवेल कल्चरल सेंटरतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिंदुस्तानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेत गडहिंग्लज येथील अर्णव बुवा याने प्रथम क्रमांकाचे शैलजा तळेकर स्मृती पारितोषिक पटकावले आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. या स्पर्धेत ‘मियाँ की तोडी’ हा राग सादर करुन त्यांने उपस्थितांची मने जिंकली. पुणे येथील अथर्व बुरसे याने सात हजार रुपयांचे पं. वामनराव भावे स्मृती पारितोषिक संपादन केले. त्याने या स्पर्धेत ‘मारु बिहाग’ राग सादर केला. पुणे इथल्याच सागर देशमुख याने पाच हजार रुपयांचे प्रभाकर आघारकर स्मृती पारितोषिक मिळविले तर ठाणे येथील केदार खोंड याला चार हजार रुपयांचे विश्वास भिडे स्मृती विशेष गुणवत्ता पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सगळेच युवा गायक तयारीचे असल्यामुळे स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. विदुषी शुभदा पावगी आणि पं. मोहनकुमार दरेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले तर सिद्धार्थ कर्वे, सिद्धार्थ जोशी, भूषण पाटील आणि कौस्तुभ भाग्यवंत या युवा कलाकारांनी स्पर्धकांना उचित अशी साथसंगत केली. एकूणच स्पर्धेची ही अंतिम फेरी म्हणजे रसिकांसाठी एक दर्जेदार युवा संगीत संमेलनच ठरले. स्पर्धा समिती प्रमुख मधुरा सोहनी यांनी स्पर्धेचे नेटके नियोजन केले. साधारणपणे अशा प्रकारच्या स्पर्धांमधून महिलावर्गाचा वरचष्मा दिसून येतो पण यावर्षी मुलांनी बाजी मारल्याचे दिसून आले.