पनवेल दि.१४: नव्या मुंबईवर आपला सांस्कृतिक ठसा उमटविणारी, पनवेलचा सांस्कृतिक मानदंड मानली जाणारी व पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली ‘पनवेल कल्चरल सेंटर’ ही संस्था 36 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करीत असून संस्थेने दि. 19 एप्रिल 2026 रोजी 36 व्या वर्धापन दिनाचे आयोजन केले आहे. सकाळच्या सत्रात सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक तन्मय देवचके आणि त्यांच्या सहकलाकारांचा ‘सृजन – रागदारी : फोक ते फ्युजन’ हा कार्यक्रम होईल.
संध्याकाळच्या सत्रात सुरुवातीला संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथक स्पर्धेतील विजेत्या कलाकारांचे कथक सादरीकरण होईल व त्यानंतर वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम होईल. संस्था गेली अनेक वर्षे संगीत-नाट्य-साहित्य-कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या परंतु, प्रसिद्धीच्या झोतात फार न आलेल्या गुणी व्यक्तींचा शाल-श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करते. ह्यावर्षी संस्था बाबादास तुपे या गानगुरुंचा गौरव करणार आहे. आजचे आघाडीचे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी या समारोहास प्रमुख अतिथीरुपात उपस्थित असतील. ‘एबीपी माझा’चे वृत्तनिवेदक दीपक पळसुले त्यांची मुलाखत घेतील. यावेळी संस्थेच्या ‘संवाद’ या स्मरणिकेचे प्रकाशन हृषिकेश जोशी यांच्या हस्ते होईल. यावेळी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष मिलिंद गोखले यांच्याकडून नंदकुमार कर्वे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. सकाळच्या सत्राचे सूत्रसंचालन महेश गाडगीळ करतील, तर संध्याकाळच्या सत्राचे मोहन हिंदुपूर.
हा समारोह पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात सकाळी 9.30 ते 12.00 आणि सायंकाळी 5.30 ते 8.30 अशा दोन सत्रात आयोजित केला जात असून संस्थेच्या सभासदांना त्याचा विनामूल्य आनंद घेता येईल. सदस्येतर रसिकांसाठी दोनशे रुपये प्रवेशमूल्याच्या प्रवेशिका पनवेल कल्चरल सेंटरमध्ये सायं. 5.30 ते 8.00 दरम्यान अथवा इम्प्रेशन्स, शुश्रुषा हॉस्पिटलसमोर, पनवेल येथे सकाळी 11.00 ते दु. 3.00 व सायं. 5.30 ते 9.30 दरम्यान उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क : जयंत टिळक – 98194 05245
![]()
