पनवेल, दि. ११: ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त युवकांमध्ये नेतृत्वगुण, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत, पनवेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘युवोत्कर्ष – The Youth Conclave’ हे युवा संमेलन रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेपर्यंत विरूपाक्ष मंगल कार्यालय, पनवेल येथे उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती फाउंडेशनचे वीरेंद्र चंपानेरकर उपस्थित होते. तसेच युथ फॉर भारतचे अध्यक्ष ओंकार पाटील यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पनवेलमधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्वी तरुणांसोबत संवादात्मक मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सत्रात व्यापार व वाणिज्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे CA. हिमांशू पंड्या, पर्यावरण व निसर्ग क्षेत्रातील सर्वेश अभ्यंकर, यूट्यूब आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जयदीप काणे, पत्रकारिता क्षेत्रातील जय महाराष्ट्र च्या वृत्तनिवेदिका रिद्धी म्हात्रे तसेच गायन व कला क्षेत्रातील मिथिला माळी सहभागी झाले.
या सर्व मान्यवरांच्या मुलाखती ABP माझाचे वृत्तनिवेदक दीपक पळसुले यांनी घेतल्या. अत्यंत अनौपचारिक, मुक्त आणि संवादात्मक वातावरणात झालेल्या या मुलाखतींमधून युवकांना विविध क्षेत्रांतील अनुभव, संघर्ष, संधी आणि यशाचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे सत्र युवकांसाठी विशेष आकर्षणाचे ठरले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात वीरेंद्र चंपानेरकर यांनी युवकांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावी वक्तव्यातून त्यांनी युवकांची ऊर्जा, क्षमता आणि सामाजिक जबाबदारी यांचा सकारात्मक उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थित युवकांना प्रेरणा आणि नवी दिशा मिळाली.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात पनवेलमधील युथ फॉर भारत-पनवेल च्या युवकांनी एकत्र येत ‘भजन जॅमिंग’ सादर केले. भक्तिगीतांच्या सुरांनी आणि उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ देतानाच भारतीय संस्कृतीशी जोडणारा हा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाची सांगता कलाश्रुती नृत्य अकादमीच्या पनवेल च्या कलाकारांनी ‘वंदे मातरम्’ या गीतावर सादर केलेल्या मनमोहक नृत्याने झाली. देशभक्तीची भावना जागविणाऱ्या या नृत्य सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि संपूर्ण सभागृहात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
या संमेलनाला सुमारे २५० युवकांसह समाजातील जवळपास १००-१५० विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. युवकांना एकत्र आणून त्यांच्या विचारांना, कलागुणांना आणि क्षमतांना व्यासपीठ देण्यासोबतच सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी प्रेरित करणारा ‘युवोत्कर्ष’ हा उपक्रम यशस्वी ठरला.
