पनवेल ता. 03 : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याबाबत आज पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील व रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, पनवेल महानगरपालिका उपमहापौर प्रमिला पाटील, पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती बबन मुकादम, जिल्हा परिषद शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते प्रकाश बिनेदार, मनपा सदस्य, मनपा उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मनपा शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ललिता दहितुले तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर व्हीसीद्वारे उपस्थित होते. त्यांनी हा विषय प्रलंबित न ठेवता चर्चा करून तातडीने प्रश्न सोडविण्याबाबत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
शाळांच्या हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रशासकीय, कायदेशीर व तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शाळांची सध्यस्थीती पाहता विद्यार्थीहितासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत एकमत झाले. जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण नियमानुसार पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत पनवेल महानगरपालिका व रायगड जिल्हा परिषद सकारात्मक असून दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. शिक्षक हस्तांतरणाबाबत देखील सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत देखील नियमानुसार निर्णय घेऊन तांत्रिक प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निश्चित झाले.
यावेळी बैठकीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय प्रश्न, शाळांमधील उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील विकासकामे याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!