पनवेल, दि.3 (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी अंमली पदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाई करत तब्बल 18 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 9 लाख 22 हजार 80 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. या माहितीची शहानिशा करून बाळा कुंभार यांनी पोलीस उपनिरीक्षक देवकते व त्यांच्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि देवकते आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित इसम घटनास्थळी येताच त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेला गांजा आढळून आला. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 18 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 9 लाख 22 हजार 80 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक देवकते यांच्यासह पोलीस हवालदार बोरसे, पोलीस शिपाई दत्ता जाधव, मोकळ, कराड व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस दलाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
