उलवे नोड, ता. 17 : दि. बा. पाटील साहेब हे संपूर्ण बहुजन समाजाचे लोकनेते होते. दिबांच्या आणि पाच हुताम्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी, 1984 च्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्याची माहिती नवीन पिढीला समजण्यासाठी दर्जेदार चित्रपटाची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे ठाम मत पागोटे येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केले.
पागोटे येथे आज हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कबड्डी सामन्यांचे उद्घघाटन कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर हुतात्म्यांना आदरांजली वाहताना महेंद्र घरत बोलत होते.
यावेळी महिला बाल विकासमंत्री आदिती तटकरे या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी दिबांच्या अलौकिक कर्तृत्वाचा वारसा आपण जपायला हवा, असे मत व्यक्त केले.
उरणवासीयांसाठी हुतात्मा भवन आणि पागोटे गावाला मैदान मिळालेच पाहिजे, अशा भावना महेंद्र घरत यांनी व्यक्त करून मंत्री आदिती तटकरे यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंतीसुद्धा केली.
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा साडेबारा टक्के जमिनीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, अशी खंत जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी नामदेव शंकर घरत (चिर्ले), रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतूम), महादेव हिरा पाटील (पागोटे), केशव महादेव पाटील (पागोटे), कमळाकर कृष्णा तांडेल (पागोटे) यांना पनवेलच्या महात्मा फुले आर्टस, सायन्स आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.
या कार्यक्रमाला मंत्री आदिती तटकरे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, दिबांचे पुत्र अतुल पाटील, काॅ. भूषण पाटील, सीमा घरत, दिनेश पाटील, तसेच पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!