पनवेल दि.१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजन उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर करण्यात आल्याची माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज उलवा नोड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना दिली. या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि, मागील वर्षी महाराष्ट्रात झालेल्या नमो चषक स्पर्धेत संपूर्ण राज्यातून पनवेलने चौथा क्रमांक पटकाविला होता. त्या अनुषंगाने उत्कृष्ठ आयोजन आणि नियोजनाचा फायदा या नमो चषक स्पर्धेला होणार आहे. या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, खो-खो, कबड्डी तसेच धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अॅथलेटीक्स स्पर्धा होणार आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धा फक्त पुरुष गटात व वजनी प्रकारात होणार आहेत तर कबड्डी, खो-खो आणि अॅथलेटीक्स स्पर्धा पुरुष व महिला गटात होणार आहेत. त्यामध्ये कबड्डी वजनी प्रकारात तर खो-खो आणि अॅथलेटीक्स स्पर्धा वयोगटानुसार होणार असून या नमो चषकात पाच हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असणार असून या स्पर्धेचा लाखो क्रीडाप्रेमी लाभ घेतील, असा विश्वासही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. या स्पर्धेतील राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ०७ लाख ५६ हजार रुपये, खो-खो मधील एकूण विजेत्यांना ०१ लाख ४३२०० रुपये, कबड्डी स्पर्धेतील मधील एकूण विजेत्यांना ०१ लाख ८१ हजार रुपये तर अॅथलेटीक्स स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ०४ लाख ११ हजार रुपये अशी एकूण तब्बल १४ लाख ९१ हजार २०० रुपयांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तसेच विजेत्या खेळाडूंना भरघोस रक्कमेची बक्षिसे पण विनामूल्य प्रवेश या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्ये आहे. खेळ आणि खेळाडूंच्या अनुषंगाने परिपूर्ण काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत आहे. हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारच्या १७ समित्या गठीत करण्यात आल्या असून या प्रत्येक समिती आपापली जबाबदारी पार पाडत आहेत, अशीही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. तसेच या नमो चषक स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू व क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी माहिती देताना सांगितले कि, मागिल वर्षी नमो चषक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल विधानसभा मतदार संघात २१ क्रीडा प्रकारात झालेल्या या स्पर्धेत ०१ लाख १३ हजार २७८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन पनवेलने महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला होता. त्याच अनुषंगाने यंदाही नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात करण्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले. आणि त्यानुसार स्पर्धा स्थळी जोरदार तयारी करण्यात आली असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. या नमो चषक स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, नमो चषकाचे मुख्य आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रविण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, उलवे नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, उलवे १ अध्यक्ष निलेश खारकर, उलवे २ अध्यक्ष विजय घरत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. यावेळी विनोद नाईक यांनी माहिती देताना, राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २३ जानेवारीला, कबड्डी २४ तर खो-खो २५ जानेवारीला आणि या तिन्ही प्रकारच्या स्पर्धा प्रकाश झोतात होणार असल्याचे सांगून धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अॅथलेटीक्स स्पर्धा तीनही दिवस दिवसा होणार असल्याचे सांगितले.