‘यासाठी मी खर्च करणार असलो तरी यावर सर्वांचा हक्क राहील’
पनवेल दि.१७: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजीक उलवे नोड हा भाग सिडको विकसित करत आहे. अटल सेतूमुळे मुंबईच्या अगदी नजीक आल्याने या भागाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या भागात उद्योग, राजकीय आणि सामाजिक संघटनांनी विशेष लक्ष दिले आहे. या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याची संकल्पना गव्हाण आणि उलवे विभागातील नागरिकांनी मांडली आहे. या स्मारकासाठी सिडकोकडे जमीन मागितली होती. ती जमीन सिडको देण्यास तयार झाली आहे. गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मुंबईच्या शिवाजी पार्क सारखे एक मैदान उलवे नोड मध्ये माझ्या म्हणजेच रामशेठ ठाकूर यांच्या नावाने हे मैदान निर्माण व्हावे असा प्रस्ताव काँग्रेस नेते महेंद्र घरत यांनी मांडला आणि त्याला काही ग्रामस्थांनी अनुमोदन दिले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयासाठी सिडकोने जमीन देण्याचे कबूल केले आहे. या जमीनीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी जेवढापण खर्च येईल तो रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ करण्यास तयार आहे. यासाठी २५ ते ३० कोटी रुपये खर्च करण्याची तयारीही मी दर्शवली आहे. आणि त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी तसेच संमेलने, राजकीय सभा, सांस्कृतिक महोत्सव व अन्य कार्यक्रमांसाठी उभारण्यात येणारे हे भव्य मैदान नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे. अश्वारूढ पुतळयासाठी साधारण एक एकर जमीन सिडकोने राखीव ठेवली आहे तर मैदानासाठी ५ एकरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. सामाजिक कार्यासाठी संस्था संघटनांना नाममात्र शुल्कात भूखंड सिडकोकडून दिले जाते. त्याच धर्तीवर ही जमीन सामाजिक कार्यासाठी नाममात्र दरात मिळावी. खरेतर प्रकल्पग्रस्त उभारत असलेल्या प्रकल्पाला सिडकोने जमीन मोफत द्यायला हवी. शेतकऱ्यांकडून १५ हजार रुपये एकरी या भावाने सिडकोने त्यावेळी जमीन खरेदी केली आहे. मात्र आता त्याच एकरसाठी जवळपास ५ कोटींच्यावर रक्कम भरण्यास सिडकोकडून सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून ते यामध्ये लक्ष घालतील. आणि या ठिकाणी शिवाजी पार्क प्रमाणे आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारली जाईल. यासाठी मी खर्च करणार असलो तरी यावर सर्वांचा हक्क राहील पण या सर्व वास्तूंचा ताबा अधिकार गव्हाण ग्रामपंचातीकडे राहील, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केले.