पनवेल, दि.9 (संजय कदम) : तब्बल दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. करण नामदेव पाटील (राहणार ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.
11 एप्रिल रोजी पनवेल तालुका पोलिसांना चिंचवली जवळील पनवेल दुन्द्रे  रस्त्याच्या वनविभागाच्या जागेत झुडपामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन शोध घेतला. मात्र तिची ओळख पटली नाही. पोलिसांनी तब्बल 200 पेक्षा अधिक मिसिंग महिलांची पडताळणी केली. त्यासोबत पोलिसांचा तांत्रिक तपास सुरू केला. यावेळी हत्या झालेल्या महिलेच्या वर्णनासोबत एका महिलेची माहिती प्राप्त झाली आणि पोलिसांनी त्यानुसार आपला तपास सुरू केला. यावेळी शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिता देवी भगवान राजभर (वय 30) या महिलेची ओळख पटली. तालुका पोलिसांनी या महिलेच्या संपर्कात असलेल्या इसमाला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल फोन बाबत तपास केला असता तो मृत महिलेचे संपर्कात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता या अनिता देवी राजभर या महिलेने त्याच्यासोबत लग्नाचा तगादा लावला होता पण त्याचा लग्न करण्याचा इरादा नसल्याने करण पाटील याने 6 एप्रिल रोजी तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कारमधून चिंचवली गावचे हद्दीत आणून पेट्रोलने तिला जाळले.
पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहा.पो.आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे, पो.नि.आनंद कांबळे, यांच्या सुचनेनुसार पो.उपनिरीक्षक दिपक शेळके, हर्षल राजपूत, अभिजीत व्हरांबळे, पो.अंमलदार सुनील कुदळे, आकाश भगत, शिवाजी बाबर, सतीश तांडेल, विजय देवरे, विकास साळवी, जयदीप पवार, भानुदास मोटे, भुषण म्हारसे, भिमराव खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीद्वाराद्वारे सदर आरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!