कळंबोली दि.५ : कळंबोली जवळील रोडपाली गावालगत असलेल्या डीडी चा ढाबा व मार्बल मार्केट जवळील दहा ते पंधरा झोपड्यांवर सिडको आणि पनवेल महानगरपालिकेच्या संयुक्तपणे बुधवारी सकाळी तोडक कारवाई करण्यात आली. मोठा पोलीस फौज फाटा व सुरक्षा यंत्रणेच्या नियंत्रणाखाली आज अनधिकृत ढाबा जमीनदोस्त करण्यात आला. याच एकाच ढाब्यावर गेल्या वर्षभरात तीन वेळा कारवाई केली असल्याने ढाब्यावरील तोडक कारवाई ही सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप रोडपालीतील ग्रामस्थ सुदाम पाटील यांनी केला आहे. आजच्या कारवाई दरम्यान रोडपाली मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कळंबोली जवळील रोडपाली गावाला एक सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत ढाबा सुरू होता. या ढाब्यावर आज सकाळी सिडको व महानगरपालिकेच्या संयुक्तपणे तोडक कारवाई करण्यात आली. यावेळी सिडको व महापालिकेचे अधिकारी, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी व अधिकारी, जेसीबी, पोकलेन या सर्व योजनासह ढाबा जमीनदोस्त करण्यात आला. यावेळी ढाब्याची तोडक कारवाई करण्याच्या वेळी तणावाचे वातावरण रोडपाली गावाजवळ निर्माण झाले होते. मात्र पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी सिडको अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागातर्फे लक्ष्मीकांत डावरे व सिडको अतिक्रमण पथक कर्मचारी महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रभाग ब प्रभारी अधिक्षक, प्रभाग समिती ब स्टाफ व अतिक्रमण पथक तसेच उपस्थित होते. यादरम्यान माजी आमदार बाळाराम पाटील व पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ ही जमा झाले होते. सदरच्या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पनवेल महापालिका व सिडको व्यवस्थापनाने पुरेपूर घेतली होती. मात्र सदर भूखंडावर उभारण्यात आलेल्या ढाब्यावर दोन ते तीन वेळा कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. एकाच ढाब्यावर अनधिकृत तोडक कारवाई करण्यासाठी महापालिका व सिडको प्रशासन व पोलीस प्रशासन आपला वेळ व पैसा का खर्च करीत आहे असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. याचेच कोडे रोडपाली तील ग्रामस्थांना उलगडत नाही. एकाच धाब्यावर सततची कारवाई का अन सिडको व महापालिका प्रशासन आपला वेळ व पैसा का खर्च करीत आहे अशा चर्चेला कळंबोली व रोडपालीत उधाण आले आहे. या तोडक कारवाईला विरोध करण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील व पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुदाम पाटील यांनी याबाबत सिडको अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. मात्र याबाबत ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. सिडको व महापालिकेने कारवाई केल्यानंतर त्यावर पुन्हा अतिक्रमण कसे केले जाते याबाबत महापालिका व सिडको काही सांगण्यास तयार नाहीत. अनधिकृत ढाब्यावर तोडक कारवाई केल्याबाबत संताप व्यक्त करताना रोडपालीतील ग्रामस्थ व पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीमध्ये रोडपाली गावातून सत्ताधारी पक्षाला फारच कमी मतदान झाल्याचा राग हा रोडपालीतील ग्रामस्थांवर आहे. सदरचा ढाबा चालक हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. या ढाब्या मुळे काही जणांना रोजगारही मिळत आहे. ढाबा जमीनदोस्त केल्याचे सोयरसुतक कोणालाच नाही. विधानसभेच्या निवडणुकीत रोडपालीतून भाजपाला झालेल्या कमी मतदानाचा राग ह्या तोडक कारवाईतून केला जात आहे.