नवी मुंबई दि.२७: पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे (PDGPA) रविवारी दिनांक २६ एप्रिल रोजी हॉटेल ताज विवान्ता, तुर्भे येथे १०० व्या वैद्यकीय परिषदेचे’ (CME) परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते.
पनवेलचे महापौर नितीन पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, जे एम म्हात्रे, डॉ.आनंद गोसावी डॉ. अपर्णा पवार आणि संस्थेचे मानद सल्लागार डॉ गिरीश गुणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला.
रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनात PDGP असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले आणि समाजाच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. वैद्यकीय व्यवसाय हा केवळ एक व्यवसाय नसून, समाजाप्रती सेवा, समर्पण आणि वचनबद्धतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत रात्रंदिवस काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांप्रति मनःपूर्वक प्रशंसा आणि कृतज्ञता व्यक्त केली. सर्व मान्यवरांनी उपस्थित डॉक्टरांना संबोधित केले व संघटचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल ह्यांनी उपस्थितांना संघटनेचे सामाजिक एवं वैद्यकीय क्षेत्रातील योगदान विस्तृतपणे सांगितले. डॉ. वसंत पाटील – पनवेल ह्यांना विशेष जीवन गौरव पुरस्कार तर शंकरा नेत्र रुग्णालयाचे डॉ. राजेश कापसे ह्यांना गौरविण्यात आले.
या परिषदेला असोसिएशनचे २५० पेक्षा जास्त सभासद डॉक्टर उपस्थित झाले होते. विविध विषयांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत माहितीपूर्ण व्याख्याने दिली. याद्वारे उपस्थित डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रातील नवीन बदल आणि उपचार पद्धतींविषयी सखोल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद टिपणीस ह्यानी आपल्या ओघवत्या शैलीत केले, डॉ. अमित दवे ह्यांनी आभार प्रदर्शन केले. परिषदेचे आयोजन अध्यक्ष .डॉ आशिष गांधी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आयोजन समिती, कोअर कमिटी, बोर्ड कमिटी सदस्यांनी अत्यंत प्रभावीपणे कार्यक्रमाची धुरा सांभाळली.
पनवेल परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी अशा प्रकारच्या अद्ययावत शैक्षणिक चर्चासत्रांची मोठी मदत होते, असा विश्वास या प्रसंगी डॉक्टरांनी व्यक्त केला.
