पनवेल,दि.3: माननीय पंतप्रधान महोदयांनी 2025 पर्यंत भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. क्षयरोग मुक्त भारत करण्याच्या उद्देशाने १०० दिवसीय क्षयरोग मोहिम पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविली जात आहे. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आज आय जी पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून (सीएसआर फंडातून) चार लाख रुपयाची मदत पालिकेस केली आहे. या रक्कमेचा उपयोग अधिक जोखमीच्या भागातील लोकांचे छातीचे क्ष किरण करण्यास वापरण्यात येणार आहे. माजी नगरसेवक सतिश पाटील यांच्या सहकार्यातून ही मदत महापालिकेस मिळाली.
क्षयरोगाच्या जास्तीत जास्त नवीन रूग्णांना त्वरीत उपचाराखाली आणणे, क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, क्षयरोग सहवासितांना क्षयरोग प्रतिबंधक औषधोपचार देणे तसेच मोठ्या प्रमाणावर क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने १०० दिवसीय क्षयरोग मोहिम सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती सामाजिक बांधिलकीच्या (सीएसआर फंडाच्या) माध्यमातून पालिकेस मदत करण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी तळोजा औद्योगिक संघटना, जवाहर औद्योगिक संघटना, पनवेल औद्योगिक संघटना यांच्या बरोबर बैठक घेण्यात आली होती. पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आय जी पेट्रो केमिकल इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी चार लाख रूपयांचा धनादेश आयुक्त मंगश चितळे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी उपायुक्त डॉ.वैभव विधाते, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, नगरसेवक सतिश पाटील, कुष्ठरोग अधिकारी डॉ. उषा राठोड उपस्थित होते.