पनवेल दि. ३०: कामगार नेते महेंद्र घरत हे आपल्या आंतरराष्ट्रीय नेतृत्व गुणांच्या कौशल्याने कामगारांना न्याय देण्यात सातत्याने यशस्वी होत आहेत. महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून यावर्षातील पाचवा पगारवाढीचा करार सोमवार दिनांक २९ जून रोजी करण्यात आला. मे. बाल्मर लॉरी CFS भेंडखळ येथील मे. बिपिन मरीन सर्व्हिसेस या कंत्राटाअंतर्गत काम करत असलेल्या सर्व्हेअर कामगारांसाठी हा तिन वर्षासाठी पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ, यामधे पहिल्या वर्षी ५००० रुपये, दुसऱ्या वर्षी १२५० रुपये व तिसऱ्या वर्षी १२५० रुपये तसेच ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, ३० हजार ते ५१००० हजार बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारानुसार कामगारांना १ मार्च २०२५ पासून पगारवाढीच्या फरकाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत, सरचिटणीस वैभव पाटील, बाल्मर लॉरी कंपनीचे एच. आर. हेड सतिश आंदेगावकर, ऑपरेशन सिनियर मॅनेजर रमेश व्ही. आर, बिपिन मरीन सर्व्हिसेस चे डायरेक्टर बी.डी. पाटील, कामगार प्रतिनिधी अजित ठाकूर, मनोहर ठाकूर, शक्ती पाटील, संदीप वर्तक, सचिन भोईर, सनी भोईर आदी उपस्थित होते. कामगारांनी याप्रसंगी संघटनेचे आभार मानले.
