पनवेल, दि.19 (संजय कदम) : खारघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2025-2026 मध्ये शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी करुन सोन्याच्या दागिन्यांची लुट, बनावट चावीचा वापर करुन घरातील लाखो रुपये रोख रक्कम चोरी, तसेच मोबाईल फोन चोरी आणि हरवलेले मोबाईल फोन असा लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल खारघर पोलीसांकडुन तंत्रशुध्द तपास करुन महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सांगली सह राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, झारखंड इत्यादी राज्यांमधुन सातत्याने पाठपुरावा करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन हस्तगत केलेले आहेत.
खारघर येथील प्रतिष्ठीत व्यक्तीला चाकुने वार करुन त्याचे एकुण 57 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटले होते. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 7 आरोपी अटक करुन त्यांच्याकडुन 57 लाख रुपये किंमतीचे 57 तोळे वजनाचे दागिने सांगली जिल्ह्यातुन हस्तगत केले आहेत. खारघर येथील एका महिलेच्या घराचा दरवाजा बनावट चावीने उघडुन घरातील एकुण 27 लाख रुपये रोख रक्कम चोरी केली होती. सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक करुन त्याच्याकडुन गुन्ह्यात चोरी केलेले पुर्ण 27 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खारघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2025 व सन 2026 मध्ये हरवलेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल फोन तांत्रिकदृष्ट्या शोध घेवुन महाराष्ट्रासह, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, झारखंड इत्यादी राज्यांमधुन प्रत्यक्ष जावुन, तसेच स्थानिक पोलीसांच्या मदतीने शोध घेवुन एकुण 10 लाख 74 हजार रुपये किंमतीचे एकुण 50 मोबाईल फोन हस्तगत केलेले आहेत. एकंदरीत खारघर पोलीसांकडुन गुन्ह्यांमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व हरवलेले मोबाईल फोन असा एकुण 94 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन आज हा मुद्देमाल त्यांच्या मुळ मालकांना परत करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी सहा. पोलीस आयुक्त, खारघर विभाग, विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली खारघर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय जोशी, पोनि. अशोक डमाळे, पोनि. सुरज पाटील, पोनि शितल पाटील, सपोनि शरद बरकडे, पोउपनि सुरज जाधव व खारघर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सपोफौ आगा, पोहवा कासार, तरकसे, पोना बाबरे, खेडकर, पोशि खैरे, माळी, मोरे, यांनी केली आहे. तसेच मोबाईल फोन हस्तगत करण्याची विशेष कामगिरी पोशि मोतीराम आगिवले यांनी केलेली आहे.
