पनवेल दि.6 : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये आज दिनांक 6 जानेवारी ‘पत्रकार दिनानिमित्त’ आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस आयुक्त मंगेश चितळे व जेष्ठ पत्रकार सुनिल पोतदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना आयुक्तांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, जनसंपर्क विभागप्रमुख प्रफुल घरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी काळानुरूप पत्रकारीतेचे बदलणारे स्वरूप याविषयावरती चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त मंगेश चितळे यांनी सर्वसामान्यांच्या आयुष्यातले वर्तमान पत्राचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित पत्रकार बांधवांनी आपल्या पत्रकारीता जीवनामध्ये प्रवाहानुरूप बदलत जाणाऱ्या पत्रकारितेच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले.
कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेले आचार्य बाळशास्त्री जांभेकर विविध विषयांचे अभ्यासक-संशोधक होते. तसेच १८३२ ते १८४६ या काळात त्यांनी अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८८२ मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे, हा दिवस महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला.