पनवेल दि.८: कर्मवीर अण्णा, एन. डी. पाटील, दि. बा. पाटील, जनार्दन भगत साहेब या सर्वांनी समाजहिताच्या दृष्टिकोनातून प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीला दिला पाहिजे आणि त्याच मार्गाने वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे समाजात एकता, प्रगती आणि जनकल्याणाची भावना अधिक दृढ होईल, असे मत थोर दानशूर व्यक्तिमत्व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड येथे केले.
कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार तसेच पनवेल तालुकास्तरीय “स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२६” पारितोषिक वितरण समारंभ उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर मैदानावर भव्य स्वरूपात आणि समारंभपूर्वक जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून भगतसाहेबांच्या कन्या व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अरुणशेठ भगत, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव नगरसेवक परेश ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे, संचालक अनिल भगत, प्रकाश भगत, संजय भगत, अजय भगत, रत्नप्रभा घरत, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते प्रकाश बिनेदार, ऍड. राहुल घरत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने पनवेल महापालिकेचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, पनवेल पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील तसेच पनवेल व उरण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायतीचा सन्मान यंदा करंजाडे ग्रामपंचायतीने पटकावला. त्यांना ०१ लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले”स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२६ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पळस्पे ग्रामपंचायत (५० हजार रुपये व सन्मानचिन्ह), तृतीय क्रमांक पालेबुद्रुक ग्रामपंचायत (२५ हजार रुपये व सन्मानचिन्ह) तर उत्तेजनार्थ बक्षिस शिवकर ग्रामपंचायत आणि नेरे ग्रामपंचायतीने (प्रत्येकी ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह) पटकावले. तसेच गव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम स्वच्छता पुरस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक शेलघर (५० हजार रुपये ), द्वितीय क्रमांक शिवाजीनगर (२५ हजार रुपये) तर तृतीय क्रमांक कोपर गावाला (१५ हजार रुपये) मिळाला. तसेच कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेतील विविध शाखांचा आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभही संपन्न झाला. यावेळी ‘द फोक मराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मराठी लोककलेचे विविध प्रकार सादर करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण करून मराठी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले.
जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी विभागातील भांडणतंटे दूर करण्याच्या दृष्टिकोनातून देवदूताची भूमिका सुद्धा पार पाडत समाजाला न्याय दिला.भगतसाहेबांनी कुटुंबाला नाही पण समाजाच्या हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांच्या मुशीतून राजकीय, सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते घडविले. त्याचबरोबर बेळगाव सीमा प्रश्नावर त्यांनी एक वर्ष कारावास सोसला आहे. भगतसाहेबांचे कार्य अफाट राहिले आहे, त्यामुळे त्यांचा त्याग आणि त्यांची स्मृती कायम स्मरणात रहावे, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भगतसाहेबांची जयंती आणि पुण्यतिथी सामाजिक उपक्रमात साजरी केली जाते. जनार्दन भगत साहेब हे नाव उच्चारताच समाजसेवेची एक जाज्वल्य ज्योत डोळ्यांसमोर उभी राहते. आयुष्याला केवळ जगण्याचा नाही, तर घडवण्याचा अर्थ त्यांनी दिला. “ध्येय हेच आयुष्यापेक्षा मोठे असते” हा त्यांचा संदेश आजही असंख्य हृदयांना दिशा देतो. त्यांनी सत्ता नव्हे, तर माणसं जिंकली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजकारण आणि शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाची बीजे रोवली. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या उदात्त विचारासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. त्यांच्या प्रत्येक श्वासात तळागाळातील माणसांविषयीची करुणा आणि आपुलकी होती. भुकेची वेदना त्यांनी केवळ पाहिली नाही, तर ती स्वतःच्या अंतःकरणात अनुभवली. शिक्षण हेच परिवर्तनाचं खरं शस्त्र आहे, यावर त्यांचा अढळ विश्वास होता. म्हणूनच त्यांनी समाजाला केवळ आधार नाही, तर उभं राहण्याची ताकद दिली. दूरदृष्टी, अथक परिश्रम, अढळ चिकाटी आणि समाजहिताची तळमळ या गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व असामान्य बनवले. पनवेलसाठी ते आधारवड आणि देवदूत ठरले. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा आणि त्यांची कार्यपद्धती प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त दर चार वर्षांनी त्यांच्या कार्याची उजळणी करत समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना सन्मानित केलं जातं. तसेच, दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांच्या स्मृतींना वंदन केले जाते. जनार्दन भगत साहेब हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते ते एक विचार होते, एक प्रेरणा होते आणि ती प्रेरणा कायम स्मरणात राहून वाटचाल करत राहू या अशा भावना उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त करत भगतसाहेबांना आदरांजली वाहिली.
यावेळी स्व. जनार्दन भगत साहेबांच्या जीवनावरील आढावा घेणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अर्थात अमृतमहोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर निर्मित करण्यात आलेल्या ‘रामपर्व’ या डॉक्युमेंटरीचे अनावरण चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर व नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
