पनवेल ता.22: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी, विविध विभागांमधील समन्वय आणि व्यापक जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या अभियान समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी विधान भवन येथे पार पडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अभियानाच्या पुढील वाटचालीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
विधान भवनातील कामकाज सल्लागार समिती कक्षात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची रणनीती तसेच राज्यातील नागरिकांचा अधिकाधिक सहभाग कसा वाढविता येईल, यावर विचारमंथन करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी अभियान हे केवळ प्रशासकीय उपक्रम न राहता लोकचळवळ बनावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी अभियानाच्या आगामी टप्प्यांची माहिती देत राज्यभर प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा सादर केला. तसेच अभियान अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सामाजिक घटक यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस विधान परिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार नीलमताई गोऱ्हे यांच्यासह आमदार प्रमोद जठार, माधवी नाईक, प्रज्ञा सातव, प्रविण दरेकर, सुनील कर्जतकर, श्रीकांत भारतीय, हेमंत पाटील, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर आमदार प्रसाद लाड आणि योगेश टिळेकर यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदविला.
बैठकीत उपस्थित सदस्यांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध सूचना मांडल्या. राज्यभर महसूल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला अधिक लोकाभिमुख स्वरूप देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
