पनवेल दि.२१: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक २१ जून रोजी पनवेल को-ऑप. सोसायटीच्या पनवेल जिमखाना, ५२ बंगला, पनवेल येथे सकाळी ७ ते ८ या वेळेत भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भारताने संपूर्ण जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी असून योगाच्या माध्यमातून शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. नियमित योगाभ्यासाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात योग शिक्षिका पूर्वी झा यांनी उपस्थित नागरिकांना योगासन, प्राणायाम व विविध योग प्रकारांचे प्रत्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिक योगाभ्यासाचा लाभ घेतला.
प्रबळगड: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवारी ‘चलो प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक’ या विशेष साहसी आणि आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमात भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत युवकांसमवेत योगसाधना केली. योग, साहस आणि निसर्ग यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रबळगड आणि कलावंतीण सुळका हे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ मानले जातात. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ट्रेकमध्ये सहभागी युवकांनी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात ट्रेकचा आनंद घेतला. ट्रेकदरम्यान विविध योगासने आणि प्राणायामाचे सत्र आयोजित करण्यात आले. यामुळे उपस्थितांना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
उलवे: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी योगगुरू करुणा तावडे यांनी उपस्थित नागरिकांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रकार शिकवत निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते, असे त्यांनी सांगितले.
