पनवेल दि.०२ (हरेश साठे) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘स्वर संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमाने पनवेल परिसरातील संगीतप्रेमी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”, “श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ” आणि नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात संपन्न झाला. संगीत, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा सुरेल संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी, ह. भ. प. महादेवबुवा शाहबाजकर आणि ऍड. प्रसाद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संगीताच्या सुरेल मैफलीला प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, भाजपचे माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, रायगड भूषण पंडित उमेश चौधरी, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, प्रतिभा भोईर, पूनम ठाकूर, वसंतबुवा पाटील, जे. टी. पाटील, मनोहर मसणे, संतोष पाटील, अशोक पाटील, पं. तुषार चॅटर्जी, विलास खानावकर, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, स्वप्निल ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजकारण, शिक्षण, संस्कृती आणि लोकसेवा या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून ‘स्वर संध्या’ हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग ठरला.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या सारेगमप लिटल चॅम्प फेम गायिका अंजली गायकवाड आणि ज्ञानेश्वरी गाडगे यांनी आपल्या सुमधुर आणि प्रभावी गायनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या भावगीत, भक्तिगीत, अभंग, तसेच लोकप्रिय गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही गायिकांनी आपल्या सुरेल आवाजातून निर्माण केलेल्या संगीतविश्वात रसिक तल्लीन झाले होते. पंडित प्रतापबुवा पाटील यांची उत्कृष्ट मृदुंग साथ, प्रसाद पाध्ये यांची तबला साथ तसेच सूर्यकांत सुर्वे यांचे प्रभावी तालवाद्य लाभले. या अनुभवी कलाकारांच्या समर्थ साथसंगतीमुळे संपूर्ण कार्यक्रमाची रंगत अधिक खुलली. स्वर आणि ताल यांचा अप्रतिम मिलाफ अनुभवताना रसिकांनी वारंवार दाद देत कलाकारांचा गौरव केला.
याशिवाय नवदुर्गा प्रासादिक भजन मंडळ कोपरा यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भक्तिमय भजनांनी कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली. गायिका शिवमाला पाटील यांनी आपल्या ओजस्वी आणि भक्तिरसपूर्ण गायनातून उपस्थितांना भक्तिमय वातावरणाची अनुभूती दिली. त्यांना पखवाज वादक निलेश पाटील आणि तबलावादक मिलिंद कडू यांची सुरेख साथ लाभली. भजनांच्या सादरीकरणादरम्यान सभागृहात भक्तिरसाची अनुभूती निर्माण झाली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके यांनी आपल्या खास शैलीत प्रभावीपणे केले. त्यांनी कलाकारांची ओळख करून देतानाच कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणाची वैशिष्ट्ये रसिकांसमोर उलगडून सांगितली.
अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सांगीतिक सोहळ्याने संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय आठवणी निर्माण केल्या. दर्जेदार गायन, सुरेल वाद्यसंगत, भक्तिमय वातावरण आणि रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ‘स्वर संध्या’ हा कार्यक्रम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षातील एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समिती तसेच रायगड भूषण पं. उमेश चौधरी, नादब्रह्म साधना मंडळचे अक्षय चौधरी, वैभव चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली. उपस्थितांनी आयोजनाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले. तसेच अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात कला, संस्कृती आणि संगीताविषयीची जाणीव अधिक दृढ होत असल्याच्या भावना अनेक रसिकांनी व्यक्त केल्या.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133