अलिबाग दि. 24 : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग दि. 24 व 25 जून 2026 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी दिले आहेत.
दि. 23 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे महादरवाजा जवळील पायरी मार्गावर दरड कोसळून मार्ग बंद झाला आहे. संबंधित विभागाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, हे काम पूर्ण होईपर्यंत पर्यटकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तहसीलदार महाड यांनी केलेल्या विनंतीनुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांना नाणे दरवाजा, चित्त दरवाजा तसेच किल्ले रायगड परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने पर्यटकांना या कालावधीत पायरी मार्गाचा वापर न करण्याचे आवाहन केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51, 54 व 56 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
