अलिबाग,दि.5: ब्रेक दी चेन (Break the Chain)” अंतर्गत लागू केलेल्या सुधारीत प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दि.14 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8.00 वाजल्यापासून दि.01 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत व दि. 22 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8.00 वाजल्यापासून दि.01 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधीत कृत्ये करण्यास मनाई असल्याचे आदेश जारी करण्यात आले होते.
       महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेशान्वये या पूर्वी “ब्रेक दि चेन (Break the Chain)” अंतर्गत आदेशान्वये लागू केलेले निर्बंध त्यात करण्यात आलेल्या सुधारणांसह दि.15 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आले असल्याने कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या मनाई आदेशांस, त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह दि.01 मे 2021 रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून ते दि.15 मे 2021 सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
      कोविड-19 संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भावास प्रतिबंध करण्याकरीता विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच सध्या जिल्ह्यामध्ये करोना प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याने अनेक लोक लसीकरण केंद्रावर मोठ्या संख्येने लसीकरण करुन घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. सद्य:स्थितीत सर्व लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. परंतु लसीकरणासाठी शहरातून व खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होत असल्याने लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे, गर्दीवर नियंत्रण आणणे, यावरुन डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच बंदोबस्तावरील पोलीस अंमलदार यांच्या सोबत अनेक वेळा नागरिकांसोबत वादविवादाचे प्रसंग घडत असतात.
      तसेच दि.01 मे 2021 रोजी पासून 18 वर्षावरील नागरीकांचे लसीकरण करण्याचे शासनाकडून घोषित केलेले असल्यामुळे आणखी मोठ्या संख्येने लोक लसीकरणासाठी बाहेर पडून लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांना आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण करताना समस्या निर्माण होवू नयेत व लसीकरण मोहीम चांगल्या प्रकारे पार पाडावी तसेच लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे करोना विषाणूच्या प्रादूर्भाव होण्याची शक्यता विचारात घेता लसीकरण केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये सीआरपीसी कलम 144 नुसार संचारबंदी आदेश जारी करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार प्राप्त अधिकारातून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये संचार बंदी लागू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
       जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार लसीकरण केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये 18 ते 44 वयोगटातील पूर्व नोंदणीनुसार लसीकरणासाठी बोलाविण्यात आलेल्या व्यक्ती,लसीकरणाकरीता आलेल्या व्यक्ती (सोबत वैध कागदपत्रे उदा. समक्ष प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले टोकन, पास व पहिल्या लसीकरणाच्या नोंदीसंदर्भातील कागदपत्रे), अशा व्यक्तींमध्ये जेष्ठ नागरीक अथवा शारिरीकदृष्ट्या सक्षम नसलेली व्यक्ती असल्यास त्यांच्या  सोबत येणारी व्यक्ती,लसीकरण केंद्रावर वैद्यकीय सेवा देणाऱ्या/वैद्यकीय सेवेशी निगडीत व्यक्ती, पोलीस अधिकारी/कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, लसीकरण केंद्राच्या 200 मीटर परिसरास रहिवास असलेली व्यक्ती व अशा रहिवाशी क्षेत्रात मान्यता दिलेल्या जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी येणारी व्यक्ती, केवळ या व्यक्तींनाच प्रवेश अनुज्ञेय आहे.
       या प्रतिबंधात्मक उपययोजनांची काटेकोरपणे अंमलबाजवणी करुन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून या आदेशाची अंमलबजावणी नागरिकांमार्फत काटेकोरपणे केली जाईल,या दृष्टीने आवश्यक नियोजन व उपाययोजना जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी कराव्यात तसेच या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270,271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असा इशाराही जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी  निधी चौधरी यांनी दिला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!