अलिबाग दि.6: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरू असून, जिल्ह्यासाठी ६१ हजार २०० कोविशिल्ड, कोवॅक्सिन लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये १६ हजार कोवॅक्सिन लस असून, यामधून‌ १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. तर ४५ हजार २०० कोविशिल्ड लस असून, यामधून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

१८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांसाठी १६ हजार लसी
जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय माणगाव, रोहा, कर्जत, पेण, कर्जत व ग्रामीण रुग्णालय उरण, महाड या ८ रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी १६ हजार कोवॅक्सिन लस उपलब्ध झाल्या असून, त्यांचे उपजिल्हा रुग्णालय माणगाव, रोहा, कर्जत व ग्रामीण रुग्णालय उरण, महाड या ५ रुग्णालयांमध्ये प्रती केंद्र ३ हजार २०० लासींचे वाटप करण्यात आले आहे. तर यापूर्वी जिल्ह्याला १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांच्या लासीकरणासाठी मिळालेल्या १० हजार कोविशिल्ड लसींचे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय पेण, पनवेल यांना वाटप करण्यात आले आहे. १४ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

७० टक्के लसी दुसऱ्या डोसकरिता राखीव
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी ४५ हजार २०० कोविशिल्ड लसी उपलब्ध झाल्या आहेत. यामधील ७० टक्के लसी या दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या ४५ हजार २००  कोविशिल्ड लसींपैकी ११ हजार ३०० लसी पनवेल महानगर पालिकेला देण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांना ११ हजार ३०० लसींचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित २२ हजार ६०० लसींचे जिल्हाभरातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारीतील निवडक उपकेंद्र यामध्ये वाटप करण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील काही नागरिकांनी कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसऱ्या डोससाठी कोवॅक्सिन लसीची गरज आहे. त्यांच्यासाठी कोवॅक्सिन लसीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून, लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी
सध्या सर्वत्र कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, सतत स्वच्छ हात धुवावेत, मास्क वापरावा, गरम पाणी प्यावे, गरम पाण्याचा वाफारा घ्यावा, सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, वास न येणे, चव नसणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित करुणा चाचणी करून घ्यावी. चाचणीत कोरोना प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली औषधे वेळेत घ्यावित व केलेल्या सूचना पाळाव्यात असे आवाहन हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!