पनवेल, दि.21 (संजय कदम) : पनवेल तालुका परिसरात गुरे चोरी करणार्या सराईत टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पनवेल, उरणसह इतर विभागातील गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.
पनवेल तालुक्यात राहणारे अभिदास गायकर यांच्या घरासमोर बांधून ठेवलेले दोन बैल चोरी करुन नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच प्रस्तूत गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपीच्या वर्णनाव्यतिरिक्त इतर कोणताही धागादोरा नसतांना वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनुरुध्द गिजे, पोउपनि. हर्षल राजपुत व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरु केला. तांत्रीक तपासावरुन तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज चे आधारे यातील आरोपी सलमान उर्फ राजा करीम शेख, वय 25 वर्षे (रा.तळोजा) व तारीक यासीन कुरेशी, वय 23 वर्षे (रा.कौसा, मुंब्रा) येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे केलेल्या तपासामध्ये तसेच तांत्रीक तपासामध्ये इतर पाहिजे आरोपीत हे जिल्हा नांदेड येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सपोनि गिजे व तपास पथकाने नांदेड येथे जावून आरोपी फरहान हनीफ बुबेरे, वय 25 वर्षे (रा.तळोजा) तसेच उवेष उर्फ ओवेस शकील कुरेशी, वय 19 वर्षे (निजामपुरा, भिवंडी) यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या टोळीने यापुर्वी पनवेल व उरण परिसरात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याची स्वखुशीने कबुली दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तळोजा पोलीस ठाणे, उरण पोलीस ठाणे, रोहा पोलीस ठाणे, विष्णूनगर पोलीस ठाणे डोंबिवली, पोयनाड पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे कल्याण, खालापूर पोलीस ठाणे, पेण पोलीस ठाणे, नागोठणे, डायघर पोलीस ठाणे आदी ठिकाणी त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
हि यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल प्रशांत मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपुत यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व दिलेल्या सुचनांमुळे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा-या टोळीचा बिमोड करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंदा कांबळे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक अनुरुध्द गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा विकास साळवी, सोमनाथ रणदिवे, विजय देवरे, महेश धुमाळ, सुनिल कुदळे, सतिश तांडेल, शिवाजी बाबर, वैभव शिंदे, पोशि राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत, विद्या गायकवाड, भिमराव खताळ यांनी पार पाडली.