पनवेल, दि. 1 : महाराष्ट्र नागरी सेवा शर्ती, १९८२ नुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंते संजय कटेकर यांच्यासह चार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव व सत्कार समारंभ आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे उत्साहात संपन्न झाला.
सन्मानित सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये शहर अभियंता संजय बारका कटेकर, कार्यकारी अभियंता सुधीर विश्वासराव साळुंखे, हवालदार/नाईक मनोज गणपत गायकवाड तसेच बांधकाम विभाग मजूर सुरेश बाळकृष्ण गायकर यांचा समावेश होता. तसेच नगर रचना विभागाचे अभियंता नितीन हुद्दार यांचादेखील स्वेच्छानिवृत्ती निमित्त सन्मान करण्यात आला.
यावेळी पनवेलचे महापौर नितीन पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, पनवेल स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता म्हात्रे, पनवेल महानगरपालिका नगरसेवक – नगरसेविका, महानगरपालिकेचे माजी आयुक्त सुधाकर देशमुख, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचे तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभांचे धनादेश प्रदान करून सेवाकार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या सेवेत दिलेल्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा विशेष वैयक्तिक सन्मान केला. तसेच यावेळी मनोगतात पनवेलच्या विकासातील सन्मानितांचे योगदान स्पष्ट केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महापौर नितीन पाटील यांनी सन्मानितांचा ‘अनुभवसंपन्न व कामासाठी झोकून दिलेली माणसे’ असा गौरव करत आयुष्याच्या पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माजी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सन्मानितांचा ‘समस्यांमधून कुशलतेने मार्ग काढणारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची फळी’ असा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या.
सन्मानितांपैकी माजी शहर अभियंता संजय कटेकर यांनी आपल्या मनोगतात नगरपालिका असल्यापासून पनवेलच्या विकासाचा साक्षीदार असल्याचे नमूद केले. अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाल्यामुळे स्वतःला नशीबवान म्हणत सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी व पनवेलची जनता यांचा ऋणी असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी केले तर आभारप्रदर्शन कनिष्ठ अभियंता अनिकेत बारी यांनी केले.
समारंभास महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, माजी सहकारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहपूर्ण वातावरणात हा सत्कार समारंभ संपन्न झाला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!