पनवेल, दि.२५ (संजय कदम): “पनवेलकरांना सर्व प्रकारच्या खरेदीसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणारे ओरायन मॉल हे शहरातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती खरेदी केंद्र आहे. खरेदीसोबतच ग्राहकांना मनोरंजनाचे विविध अनुभव देण्याचा मॉलचा उपक्रम कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सुनील बर्वे यांनी काढले.
ओरायन मॉल, पनवेल येथे आयोजित ‘शॉप अँड विन’ या विशेष लकी ड्रॉ सोहळ्यात ते बोलत होते. या सोडतीत सुहास खुलापकर हे भाग्यवान विजेते ठरले. त्यांना येझदी अॅडव्हेंचर ही दुचाकी जिंकण्याचा मान मिळाला.
यावेळी सुनील बर्वे यांनी मॉलच्या संकल्पनेचे आणि ग्राहकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. खरेदीसाठी एकाच ठिकाणी विविध पर्याय उपलब्ध असणे ही ग्राहकांसाठी सोयीची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे ग्राहकांना खरेदीचा अनुभव अधिक आनंददायी होतो आणि मॉलशी त्यांचे नाते अधिक दृढ होते, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर यांच्यासह ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लकी ड्रॉमध्ये विजेत्याचे नाव जाहीर होताच उपस्थितांनी उत्साहात आनंद व्यक्त केला.
