पनवेल, दि. १३: समाजातील थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना जीवनदान देण्याच्या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या ३१ व्या रक्तदान शिबिराला तब्बल १४९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानाचा महायज्ञ यशस्वी केला. श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे, पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट, विद्यार्थी वाहक संस्था पनवेल, पनवेल-नवी मुंबई पत्रकार संघ, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच, विश्व सिंधी सेवा संगम आणि एमजीएम रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. १२ जुलै २०२६ रोजी पूज्य सिंधी पंचायत झुलेलाल मंदिर, पनवेल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन नियमित रक्तदाते राकेश पाटील, मनीष यशवंतराव आणि राजेंद्र गुरंबे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रक्तदानासाठी आलेल्या रक्तदात्यांचा उत्साह आणि सेवाभाव विशेष उल्लेखनीय ठरला. यावेळी उपस्थित असलेले आरटीओ अधिकारी राजेश जी. झेंडेकर यांनी या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. समाजहितासाठी सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या रक्तदान शिबिराची प्रशंसा करत त्यांनी पुढील रक्तदान शिबिरामध्ये स्वतः उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची घोषणा केली. तसेच अवयवदान जनजागृती उपक्रमात स्वतः अवयवदान करण्याची शपथ घेत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. या शिबिराला पूज्य सिंधी पंचायतचे किशन तलरेजा, दौलत सचदेव, दिलीप जैस्वानी, चंदर देवानी, महेश तनवाणी, भागचंद खुबचंदानी आणि सनी गिडवानी यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. या रक्तदान शिबिराच्या यशामागे अनेक सेवाभावी व्यक्तींची अथक मेहनत आणि निःस्वार्थ समर्पण दडलेले आहे. ॲड. मनोहर सचदेव, ॲड. अमोल साखरे, साक्षी सचदेव, पांडुरंग हुमणे, किसन रौंदळ, मुरलीधर ढाके, संगीता साखरे, उज्वला, सचिन भिसे, प्रभाकर म्हात्रे, बन्सीलालजी तळेकर, राजेशजी भगत तसेच सर्व सहभागी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नियोजन, जनजागृती आणि शिबिराच्या व्यवस्थापनासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे हा उपक्रम दरवेळीप्रमाणे यंदाही अत्यंत यशस्वी ठरला. आयोजकांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व १४९ रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत, त्यांच्या रक्तदानामुळे अनेक गरजू आणि थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना नवजीवन मिळणार असल्याचे नमूद केले. रक्तदानासाठी वेळ देणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा सेवाभाव हा समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या या योगदानामुळेच समाजातील मानवतेची भावना अधिक बळकट होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. संस्थेतर्फे पुढील रक्तदान शिबिर रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली असून, याही शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानाच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
