पनवेल दि.३०: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या केंद्रांवर सादर झालेल्या एकांकिकांमधून एकूण 25 एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत.
नाट्यचळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धींगत व्हावा याकरिता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. यंदा या स्पर्धेचे अकरावे वर्ष आहे. प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून आशीर्वाद मराठे व मानसी दोशी-मराठे यांनी काम पाहिले.
अंतिम फेरीत बॉईल्ड-शुद्ध शाकाहारी (कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे), सखा (एमईएस आयएमसीसी कॉलेज, पुणे), हनिमून (एस. एम. प्रॉडक्शन, पुणे), देव-बाप्पा? (कलाकार मंडळी, पुणे), अलमोस्ट डेड (रंगप्रसंग, कोल्हापूर), कलम 375 (परिवर्तन, कोल्हापूर), पिंडग्राम (डी.वाय. पाटील कॉलेज, कोल्हापूर), व्हाय नॉट (आर.आय.टी., इस्लामपूर), गोधा आणि कमुचा फार्स (रंगशाळा, जळगाव), वेदना सातारकर हजर सर (सी.के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय, पनवेल), वर्तुळ (रंगवेध थिएटरर्स, पनवेल), कुक्कुर (सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे), Gene Gene झिंगाट (म.ल. डहाणूकर, मुंबई), चिनाब से रावी तक (क्राऊन नाट्यसंस्था आणि स्टोरीया प्रॉडक्शन, डोंबिवली), ब्रह्मपुरा (एम.डी. कॉलेज, परळ, मुंबई), जुगाड लक्ष्मी (गुरू नानाक खालसा कॉलेज, मुंबई), बॉडी ऑफ नरेवाडी (फितूर थिएटर सोसायटी, संत झेवियर कॉलेज, मुंबई), आविघ्नेया (सिडेनहॅम कॉलेज, मुंबई), गुड बाय किस (जिराफ थिएटरर्स, मुंबई), पाटी (एकदम कडक नाट्यसंस्था, मुंबई), जापसाल (उगवाई कलारंग, फोंडाघाट कणकवली), सर्पसत्र (एम्पिरिकल फाउंडेशन, कल्याण), न्युरालिंक (तोंडक मोडक नाट्यसंथा, ठाणे), क्रॅक्स इन द मिरर (कलांश थिएटरर्स, मुंबई), पसायदान (कल्लाकार्स, नौपाडा ठाणे) या एकांकिका दाखल झाल्या आहेत.
या स्पर्धेची अंतिम फेरी 10 ते 12 जानेवारीदरम्यान पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. अंतिम फेरीतील विजेत्या प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेस एक लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय 75 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच इतरही वैयक्तिक पारितोषिके देऊन कलाकारांना गौरविण्यात येणार आहे.