पनवेल दि.३१: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत १९४२ च्या “चले जाव” चळवळीत सहभाग घेऊन , १९७५ मधील आणीबाणीत जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया, प्राध्यापक मधु दंडवते, रावसाहेब पवर्धन, भाई वैद्य यांच्यासोबत तुरुंगवास भोगणारे आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वराज्य घडविताना “अंत्योदया” साठी आजीवन कार्यरत असलेल्या डॉ.गुणवंतराय गणपतलाल पारीख उर्फ डॉ.जी.जी.पारीख यांनी 30 डिसेंबर रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली असून या उमद्या स्वातंत्र्यसैनिकाना शुभेच्छा देण्यासाठी राज्यासह देशातील राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती 30 डिसेंबर रोजी जी.जी. पारिख यांनी स्थापन केलेल्या युसुफ मेहरअली सेंटर संचलित मधु प्रमिला दंडवते संकुल बांधनवाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात. कर्नाटकचे मंत्री बी आर पाटील महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, तुषार गांधी, कुमार केतकर,माजी कुलगुरू तथा राज्यसभा सदस्य भालचंद्र मुणगेकर, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, मध्य प्रदेश चे माजी आमदार डॉ. सुनीलम, उषाबेन शहा, हुसेन दलवाई, अरुण श्रीवास्तव, नितीन आनेराव, मधु मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी या सोहळ्यास आपली हजेरी लावली. दरम्यान सन १९४० साली जी.जी. पारीख मुंबईत आले. सेंट जॉर्ज कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत. तेव्हा ते अवघ्या १६ वर्षांचे होते. त्याच काळात देशात स्वातंत्र्याचा लढा यशाकडे मार्गस्थ झाला होता. १९४२ च्या ७ आणि ८ ऑगस्टला मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक होती. गांधीजींनी ‘छोडो भारत’ ची घोषणा दिली. आणि गांधीजींच्या विचारांनी भारावलेले जी.जी. सक्रीयपणे या लढ्यात उतरले. स्वत:च्या कॉलेजमध्ये ब्रिटिशांविरोधात ३ दिवसीय बंद पुकारला. त्याची निदर्शनं म्हणून चर्चगेट स्टेशनला जाऊन रेल्वे रोखल्या यात जी.जीं. ना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना तुरुंगात डांबलं. साधारण१८-१९ वर्षांच्या जी.जीं.पारिखना पहिल्यांदा १० महिन्यांचा तुरुंगवास झाला. आणि पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी तुरुंग वगैरे त्यांना नेहमीचेच झाले.
सन १९४७ साली ते स्टुडंट काँग्रेसच्या मुंबई भागाचे अध्यक्ष होते. जी.जी. हे मूळचे समाजवादी विचारांचे होते. पुढे आपल्या विचारांवर जगण्याचा निर्णय घेतला. आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महात्मा गांधींजींच्या “खेड्याकडे चला” या आवाहनाला प्रतिसाद देत सायमन गो बॅक” चे नारे देत सायमन कमिशनला विरोध करणारे भारत छोडो आंदोलनाचे नेते तथा मुंबईचे सर्वात पहिले तरुण महापौर समाजवादी स्वातंत्र्य सैनिक युसुफ जाफर मर्चंट उर्फ युसुफ मेहेरअली यांच्या नावाने युसुफ मेहरअली मेमोरियल ट्रस्ट नावाची पब्लिक ट्रस्ट निर्माण करून फाळणीमुळे निर्माण झालेल्या धार्मिक परिस्थिती लक्षात घेवून राष्ट्रीय एकात्मता रुजवण्याचे कार्य सुरू केले. पुढे समाजातील अंतिम घटकातील व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून “अंत्योदय”च्या उद्देशपूर्तीसाठी स्थानिक संसाधनांवर आधारित अशिक्षित अडाणी प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळावं त्यांना आर्थिक दृष्ट स्वावलंबी बनवावं यासाठी ग्रामोद्योग, सेंद्रिय शेती, मोफत आरोग्य व शिक्षण देऊन शाश्वत ग्रामीण विकासाचे प्रकल्प उभे केले आहेत