ठाणे दि.३१: येत्या बुधवार पासून नूतन वर्ष 2025 चा प्रारंभ होणार असून यावर्षी 31 डिसेंबरला लिप सेकंद धरला जाणार नसल्याने नूतन वर्ष सन 2025 चा प्रारंभ ठीक रात्री 12 वाजता होणार असल्याचेही दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले.
सन 2025 मधील विशेष घटनांची माहिती दा.कृ.सोमण यानी करून दिली.
1) सन 2025 मध्ये जरी 25 सुट्ट्या जाहीर झाल्या असल्या तरी 4 सुट्ट्या रविवारी आल्या आहेत आणि स्वातंत्र्यदिन-पारसी न्यू इयर एकाच दिवशी आले आहेत. तसेच दसरा आणि महात्मा गांधी जयंती एकाच दिवशी आल्याने चाकरमान्यांच्या एकूण 6 सुट्ट्या बुडणार आहेत.
(2) सन 2025 मध्ये 2 सूर्यग्रहणे (29 मार्च,21 सप्टेंबर) आणि 2 चंद्रग्रहणे (14 मार्च , 7 सप्टेंबर )अशी चार ग्रहणे होणार असली तरी 7 सप्टेंबरचे खग्रास चंद्रग्रहण तेवढेच भारतातून दिसणार आहे.
(3) पुढच्या वर्षी 5 नोव्हेंबर आणि 4 डिसेंबर असे दोन सुपरमून दिसणार आहेत. सुपरमूनच्यावेळी चंद्र 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त प्रकाशित दिसतो.
(4) नूतन वर्षी 12 ऑगस्ट रोजी एकच अंगारकी संकष्टी चतुर्थी येणार आहे.
(5) नूतनवर्षी 24 जुलै, 21 ऑगस्ट आणि 18 सप्टेंबर असे 3 गुरुपुष्यामृत योग येणार आहेत.
(6) नूतन वर्षी विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत. जाने.5 फेब्रु.11, मार्च 8, एप्रिल 8, मे 14, जून 5 नोव्हें.5 आणि डिसे.2 असे एकूण 58 विवाह मुहूर्त आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टे., ऑक्टो. विवाह मुहूर्त नाहीत.
(7) नूतनवर्षी 19 मार्च ते 22 मार्च आणि 14 डिसेंबर ते 30 जाने. शुक्र ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही. 13 जून ते 6 जुलै गुरू ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही.
(8) नूतनवर्षी सर्व सण-उत्सव हे सन 2024पेक्षा 11 दिवस लवकर येणार आहेत. सन 2026 मध्ये ज्येष्ठ अधिक महिना आल्यावर सर्व सण पुढे जातील.
(9) नूतनवर्षी मकरसंक्रांत 14 जानेवारीला येणार आहे. मकर संक्रांती 2085 पासून 15 जानेवारीला आणि 2100 पासून 16 जानेवारीला येणार आहे. सन 3246 मध्ये निरयन मकर संक्रांती 1 फेब्रुवारीला येणार आहे.
(10) नूतनवर्षी प्रयाग येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रूवारी कुंभमेळा भरणार आहे.
(11) नूतनवर्षी भारताची इस्रो ही अंतराळ संशोधन संस्था चार अंतराळवीर आणि व्योममित्रा ही रोबोट महिला घेऊन गगनयान अंतराळात यशस्वी उड्डाण करून परत पृथ्वीवर सुखरूप परत येणार आहेत. असेही खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.