कळंबोली दि.३०: आपली समाज व्यवस्था ही कायदा अन नियमावरती जोपासली जात आहे. ज्याप्रमाणे आपण नियम आणि कायदे पाळतो त्याचप्रमाणे आपण प्रत्येकाने समाजप्रती असलेली कर्तव्य ओळखून वागल्यास देश सुधारण्यासाठी त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होऊ शकतो. त्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली कर्तव्य पाळली तर समाज सुधारणा ही निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही असे रोखठोक प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक मनेष बच्छाव यांनी कळंबोली येथे केले.
सुधागड विद्या संकुलाच्या पाच दिवसीय सुरू असलेल्या स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक मनेश बच्छाव हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी मुख्याध्यापक, कवी ऍड.चंद्रकांत मढवी, कळंबोली व्यापारी संघाचे अध्यक्ष कमल कोठारी, माजी नगरसेविका विद्या गायकवाड सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे, मराठी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वनिता कोळी, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रमुख संजय पाटील तसेच विद्या संकुलातील शिक्षकेतर प्राध्यापक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक विद्यालयातील चिमुकल्यांनी विविध गुणदर्शन करून आपल्या कला सादर केल्या. विविध गाण्याच्या ठेक्यावर समुह नृत्य करून उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली. विद्या संकुलातील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध गुणदर्शन करून कला प्रदर्शित केले. विविध चित्रपटातील गाण्यांच्या ठेक्यावर समूह नृत्य करून स्नेहसंमेलनाचा समारोप हा दणकेबाज केला. समारोप प्रसंगी साहित्यिक व कवी चंद्रकांत मढवी यांनी तरुण वयात आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी कसे वागावे याबाबतचे एक सुंदर व मार्गदर्शक कविता सादर केली. यावेळी विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी सुधागड विद्या संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर, प्राध्यापक ,कर्मचाऱ्यांचे तसेच उपस्थित झालेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करून अंकुर शीर्षक ने प्रेरित झालेल संमेलन हे निश्चितच सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या मेहनतीने उठावदार, दिमाखदार झाल्याचे समाधान व्यक्त केले.