90 टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस , 45 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण
पनवेल,दि.14 : गेल्या आठ दिवसापासून पनवेल महापालिका क्षेत्रात मिशन कवच कुंडल मोहिम राबविली जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठवले होते. गेल्या आठ दिवसात पालिका हद्दीत 35 हजाराहून आधिक नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. पालिका क्षेत्रातील आत्तापर्यंत एकही डोस न घेतलेल्या नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावरती जाऊन आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी केलेल्या आवाहनाला पालिका क्षेत्रात उदंड प्रतिसाद मिळाला. आत्ता पर्यंत पालिका क्षेत्रात एकुण 90 टक्के लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला असून 45 टक्के नागरिकांनी आपले दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. तिसरी लाट येऊ नये , कोरोना हद्दपार व्हावा याद्ष्टीने राज्यात वेगाने लसीकरण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन कवच कुंडलची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने दिनांक 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या दरम्यान खास लसीकरण मोहीम राबविण्यात सुरू करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना पहिला डोसचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सचिन पवार, वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, आरसीएचओ डॉ. रेहाना मुजावर ,वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक यांनी या मोहिमेचे नियोजन केले.

या अंतर्गत पालिका क्षेत्रातील इंडस्ट्रियल एरिया, मोठमोठ्या सोसायटीच्या आवारात लसीकरणाची सोय करण्यात आली होती. ज्या लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यास वेळ नाही त्यांना त्याच ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली होती. त्यासाठी मार्केट एरिया, ओरियन मॉल,डिमार्ट अशा मॉल्समध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली . झोपडपट्ट्या ,नवरात्र मंडळाच्या मंडपात ही लसीकरणाची सोय करण्यात आली. ज्या सोसायटींनी लसीकरण केंद्राची मागणी केली होती त्या त्या सोसायटींमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली होती. घरोघरी, प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण केले जात आहे. आधार कार्ड नसलेले, रस्त्याच्या कडेला असणारे जवळपास 550 बेघरांचे यावेळी लसीकरण करण्यात आले. या मोहिमे अंतर्गत फक्त महिलांसाठी सर्व लसीकरण केंद्रावरती दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पनवेल महापालिकेच्यावतीने खास सोय करण्यात आली होती. यामध्ये 3019 महिलांचे लसीकरण करण्यात आले. तसेच बेडरिडन, दिव्यांगाचेही घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले.

सध्या शहरी भागात २५ लसीकरण केंद्र सुरु असून ग्रामीण भागात ३० ठिकाणी आठवड्यातील ठराविक दिवशी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. तसेच मिशन कवच कुंडल अंतर्गत ७० मोबाईल टिमच्या माध्यमातून पनवेल कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी लसीकरण केले जात आहे. अजूनही ज्या सोसायट्यांमधील नागरिकांचे लसीकरण राहीले आहे त्यांनी पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

शासकीय लसीकरण – 5 लाख 44 हजार 146
खासगी लसीकरण – 2 लाख 60 हजार 796
एकुण लसीकरण – 8 लाख 10 हजार 942

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!